सोलापूर : वृक्षतोडीला आळा घालून धूरमुक्त व पर्यावरणपूरक अंत्यसंस्कारासाठी महानगरपालिकेने शहरात पाच गॅस आणि तीन विद्युत दाहिन्या उभारल्या आहेत. मात्र सामाजिक-धार्मिक समजुती आणि जनजागृतीच्या अभावामुळे नागरिकांकडून अद्यापही लाकूड व गौऱ्यांच्या पारंपरिक चितेलाच प्राधान्य दिले जात आहे. परिणामी, कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या दाहिन्या अनेक ठिकाणी वापराविना अक्षरशः धूळ खात असल्याचे चित्र आहे.
परिणामी, लाखो रुपयांचा खर्च करून उभारलेली यंत्रणा अपेक्षित उद्देशापासून दूर गेल्याचे दिसून येत आहे.
महानगरपालिकेने नागरिकांना पर्यावरणपूरक, धूरमुक्त आणि स्वच्छ अंत्यसंस्काराची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शहरातील विविध स्मशानभूमींमध्ये गॅस व विद्युत दाहिन्या उभारल्या आहेत. मात्र पारंपरिक पद्धतीने लाकूड व गौऱ्यांचा वापर करण्याची प्रथा आणि सामाजिक-धार्मिक समजुती यामुळे या सुविधांचा अपेक्षित वापर होत नसल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी दाहिन्या असूनही नागरिक पारंपरिक चितेलाच पसंती देत आहेत. त्यामुळे पर्यावरण संरक्षणासाठी उभारलेली ही यंत्रणा केवळ नावापुरती राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेसह सामाजिक व धार्मिक संस्थांनी पुढाकार घेऊन पर्यावरणपूरक अंत्यसंस्काराबाबत व्यापक जनजागृती करण्याची गरज आहे.
सोलापूर शहरातील देगाव, कारंबा नाका, पद्मशाली चौक, अक्कलकोट रोड व कुमठे येथे गॅस दाहिन्या, तर मोदी, रूपाभवानी व जुना पुना नाका येथे विद्युत दाहिन्या आहेत. तीन विद्युत दाहिन्यांच्या वीज बिलासाठी वर्षाला सुमारे ६० लाख, देखभाल-दुरुस्तीसाठी १५ लाख आणि २१ सेवकांच्या वेतनासाठी वर्षाला सुमारे ५५ लाख रुपये खर्च होतो. सर्व मिळून या व्यवस्थेवर वर्षाला सुमारे १ कोटी ३० लाख रुपये खर्च होत आहेत, असे महापालिका विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश परदेशी यांनी सांगितले.
एप्रिल ते जुलै २०२६ या चार महिन्यांत रूपाभवानी विद्युत दाहिनीत ३४, मोदी विद्युत दाहिनीत ८१, तर अक्कलकोट रोड गॅस दाहिनीत अवघे २ अंत्यसंस्कार झाले. उर्वरित पाच दाहिन्यांमध्ये एकही अंत्यसंस्कार झाला नाही. विशेष म्हणजे गॅस दाहिनीत एका अंत्यसंस्कारासाठी सुमारे १९ किलोचा एक सिलिंडर पुरेसा ठरतो, अशी माहिती महापालिका विद्युत विभागाचे अभियंता महादेव इंगळे यांनी दिली.
खर्च कमी, पर्यावरणाचा फायदा अधिक
विद्युत दाहिनीचे शुल्क केवळ ५०० रुपये, तर गॅस दाहिनीचे शुल्क २ हजार रुपये आहे. पारंपरिक पद्धतीने लाकूड व गौऱ्यांचा वापर केल्यास सुमारे १५ हजार रुपये खर्च येतो. त्यामुळे आर्थिकदृष्ट्याही पर्यावरणपूरक दाहिन्या नागरिकांसाठी अधिक किफायतशीर आहेत. मात्र सामाजिक व धार्मिक समजुतींमुळे त्यांचा वापर वाढत नसल्याचे दिसते.
शहरातील दाहिन्यांचे वास्तव –
– आठ दाहिन्या आणि सेवक वर्गासाठी महापालिकेचा वर्षाला सुमारे १.३० कोटींचा खर्च.
– एप्रिल-जुलैदरम्यान पाच दाहिन्यांमध्ये एकही अंत्यसंस्कार झाला नाही.
– रूपाभवानी, मोदी आणि अक्कलकोट रोड दाहिन्यांवर चार महिन्यांत मिळून केवळ ११७ अंत्यसंस्कार.
– विद्युत दाहिनीचे शुल्क ५०० रुपये, गॅस दाहिनी साठी दोन हजार रुपये तर लाकूड पारंपरिक खर्च सुमारे १५ हजार रुपये.
– महापालिका, सामाजिक व धार्मिक संस्थांनी जनजागृतीसाठी पुढाकार घेण्याची गरज.
—-