सोलापूर : “शिक्षक हा समाजाचा खरा शिल्पकार असून, शिक्षकांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणे म्हणजे भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी दिलेले योगदानच आहे. वृत्तपत्र लेखक मंचाने गुणवंत शिक्षकांचा सन्मान करून सामाजिक बांधिलकी जपली आहे,” असे गौरव उद्गार महाराष्ट्र साहित्य परिषद (मसाप) पुणे शाखा, सोलापूरचे अध्यक्ष डॉ. श्रुती वडकबाळकर यांनी काढले. सोलापूर जिल्हा वृत्तपत्र लेखक मंचाच्या वतीने आयोजित गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. नभा काकडे या होत्या. अध्यक्षीय भाषणात बोलताना डॉ. काकडे म्हणाल्या की, बदलत्या काळात वृत्तपत्र लेखकांची भूमिका जशी समाजाला दिशा देणारी आहे, तसेच शिक्षकांचे कार्यही समाज घडवणारे आहे. या दोन्ही घटकांचा हा संगम कौतुकास्पद असून पुरस्कारप्राप्त शिक्षकांनी आपले कार्य अधिक जोमाने पुढे नेले पाहिजे.
या सोहळ्यात व्यासपीठावरील मान्यवरांचा सन्मान झाल्यानंतर विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
यामध्ये स्व. मोदीनाबी मीर इसहाक शेख गुणवंत मुख्याध्यापिका पुरस्कार वि. मो. मेहता माध्यमिक शाळा सोलापूरच्या मुख्याध्यापिका श्रुती उल्हास बागेवाडी यांना, तर स्व. विजयकुमार हिराचंद शहा गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक राजकुमार स्वामीराव काळे यांना प्रदान करण्यात आला. तसेच गुणवंत शिक्षक पुरस्कार म.न.पा. मुलांची मराठी शाळा क्र. २६ च्या सहशिक्षिका सविता सतीश पवार, अक्कलकोट तालुक्यातील कल्लहिप्परगे जि. प. प्रा. शाळेचे शिक्षक आनंद बाबुराव घोडके आणि श्री समर्थ विद्यामंदिर सोलापूरचे सहशिक्षक राजकिरण आत्माराम चव्हाण यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले.
सन्मानपत्र, शाल, पुष्पगुच्छ व पुस्तक असे या पुरस्काराचे स्वरूप होते. सर्व पुरस्कारप्राप्त मान्यवरांनी आपल्या मनोगतातून मंचाच्या कार्याचा गौरव केला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सोलापूर जिल्हा वृत्तपत्र लेखक मंचचे अध्यक्ष फैय्याज शेख यांनी स्वागत व प्रास्ताविक करून उपस्थितांना मंचाचे आजीव सभासद होण्याचे आवाहन केले. डॉ. रामचंद्र धर्मसाले, प्रा. अशोक म्हमाणे व श्रीवल्लभ करकमकर यांनी पुरस्कारप्राप्त मान्यवरांचा परिचय करून दिला. कार्यवाह अरुण धुमाळ यांनी गुरुवंदना सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य प्रेमचंद मेने यांनी केले, तर सहकार्यवाह प्रा. धनंजय शहा यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या सोहळ्यास कार्याध्यक्ष रामकृष्ण आघोर, रंगसिद्ध कोरे, प्रा. गणेश लेंगरे, विठ्ठल वठारे, अशोक खानापुरे, सुनील पुजारी, मल्लिनाथ किनगी, प्रांजली मोहीकर, महेजबीन मुल्ला, अनुराधा निकम, डॉ. श्रीकांत येळेगावकर, डॉ. शिवाजी देशमुख, डॉ. श्रीकांत कामतकर, मसाप पुणे शाखा जुळे सोलापूरचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी, अण्णासाहेब कोतली, राजेंद्रसिंह लोखंडे, ॲड. अमिर बागबान, साजिदा शेख यांच्यासह विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 241