सोलापूर : शहरातील पाणीपुरवठा अधिक सुरळीत करण्यासह विविध भागांतील मूलभूत नागरी सुविधाच्या दृष्टीने स्थायी समितीने कोंडी एमबीआर येथे हायड्रॉलिक आयसोलेशन स्ट्रक्चर मॅनिफोल्ड उभारणे, लक्ष्मीनगर परिसरात नवीन १२ इंची पिण्याच्या पाणीपुरवठा लाईनचे काम, अल्पसंख्याक बहुल भागात चार रस्त्यांची उभारणी तसेच कोविडनंतर व्यवसाय बंद झालेल्या महिलेस पर्यायी जागा देण्याबाबत निर्णय घेण्यात आला.
सोलापूर महापालिका स्थायी समितीची सभा शुक्रवारी सायंकाळी येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात सभापती रंजिता चाकोते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत एकूण चार विषयांना मंजुरी देण्यात आली. कोंडी एमबीआर येथे पाणीपुरवठा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी कन्स्ट्रक्शन हायड्रॉलिक आयसोलेशन स्ट्रक्चर मॅनिफोल्ड उभारण्याच्या २६ लाख १ हजार ९८९ रुपयाच्या कामास मंजुरी दिली. या कामामुळे शहरातील पाणी वितरण अधिक संतुलित होऊन नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा होण्यास मदत होणार असल्याचे समिती सभापती रंजिता चाकोते यांनी स्पष्ट केले.
प्रभाग क्रमांक ५-ब मध्ये बाळे कॉर्नर पुलाखालून मुख्य पाणीपुरवठा लाईनवरून लक्ष्मीनगर परिसरासाठी जोडणी घेऊन चांदोले घर ते विभुते परिसरापर्यंत १२ इंच व्यासाची पिण्याच्या पाण्याची नवीन पाईपलाईन टाकण्याच्या ३६ लाख ३१ हजार २२३ रुपयाच्या कामालाही मंजुरी देण्यात आली. या कामामुळे संबंधित परिसरातील पाणीपुरवठ्याची समस्या कमी होणार आहे.
दरम्यान, अल्पसंख्याक बहुल नागरी क्षेत्र विकास योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक २१-ब मध्ये चार ठिकाणी रस्ते बांधण्याच्या एकूण ३२ लाख ८५ हजार ९०५ रुपयाच्या कामास मंजुरी देण्यात आली. दिनांक १५ डिसेंबर २०२५ मधील ही मान्यता आहे. या कामामुळे परिसरातील नागरिकांना दर्जेदार रस्त्यांची सुविधा उपलब्ध होणार आहे. अल्पसंख्यांक बहुल नागरिक क्षेत्रात निधी मिळावा या मागणीसाठी नुकतेच आंदोलन झाले त्या पार्श्वभूमीवर हा विषय मंजूर करण्यात आला आहे का या प्रश्नाच्या उत्तरात हा जुना विषय आहे. आंदोलनाचा काही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण सभापती रंजीता चाकोते यांनी दिले.
दरम्यान, मानवी दृष्टिकोनातून महत्त्वाचा निर्णय घेत श्रीमती सुनिता रंगनाथ घोडके यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यांना १९९० पासून महानगरपालिकेची जागा लॅण्ड फी तत्त्वावर देण्यात आली होती. मात्र कोविड काळातील परिस्थिती आणि त्यानंतरच्या वादामुळे त्यांचा व्यवसाय बंद झाला होता. त्यांच्या उपजीविकेचा विचार करून मुरारजी पेठ येथील सिंधी समाज शॉपिंग सेंटरलगत ८ बाय १० फूट जागा नियमानुसार लॅण्ड फी तत्त्वावर देण्याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीने मान्य केला. नगररचना विभागाने या जागेचे मासिक कर विरहित भाडे रु. १ हजार ६८ निश्चित केले असून, याबाबत पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्तांना देण्यात आले आहेत, असे सभापती चाकोते यांनी सांगितले.
Post Views: 10