सोलापूर : शहरातील मुरारजी पेठेतील प्रभाग क्रमांक ७ मधील हजरत खान चाळ परिसरात अनेक महिन्यांपासून दूषित पाणीपुरवठा होत असल्याची गंभीर तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर सुरुवातीचा अर्धा ते पाऊण तास नळातून काळे, दुर्गंधीयुक्त व गटाराच्या पाण्याची मिसळ असल्याचा संशय येईल असे पाणी येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
. या भागात चार ते पाच दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांची गैरसोय अधिकच वाढली आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार, सन २००५ मध्ये ड्रेनेज लाईन टाकताना अवघ्या एका फूट अंतरावर चार इंच व्यासाची पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी टाकण्यात आली होती. दोन्ही पाइपलाइन सुमारे वीस वर्षे जुन्या झाल्याने त्यामध्ये गळती निर्माण झाली असावी आणि त्यातून ड्रेनेजमधील दूषित पाणी जलवाहिनीत मिसळत असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे.नागरिकांनी या समस्येबाबत वारंवार तक्रारी करूनही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे जुनी झालेली जलवाहिनी आणि ड्रेनेज लाईन तातडीने बदलून सुरक्षित पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी होत आहे.
महापालिकेच्या संबंधित विभागाने हजरत खान चाळ परिसरातील जलवाहिनी व ड्रेनेज लाईनची तांत्रिक तपासणी करून आवश्यक असल्यास संपूर्ण पाइपलाइन बदलावी आणि नागरिकांना शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.
पाण्याची प्रयोगशाळेत तपासणी करण्याची मागणी
नळातून सुरुवातीला येणारे काळे व दुर्गंधीयुक्त पाणी काही वेळाने स्वच्छ दिसत असले, तरी ते आरोग्यदृष्ट्या सुरक्षित आहे की नाही, याबाबत नागरिकांमध्ये साशंकता आहे. त्यामुळे पाण्याची रासायनिक तसेच सूक्ष्मजीवशास्त्रीय तपासणी करून त्यात जीवाणू, शिसे, आर्सेनिक किंवा इतर घातक प्रदूषक आहेत का, याचा अहवाल जाहीर करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
जुन्या जलवाहिन्यांचे सर्वेक्षण करून
गळतीची ठिकाणे शोधण्याची मागणी
दरम्यान, काही दिवसांपूर्वी आसरा चौक परिसरात दूषित पाण्याशी संबंध असल्याचा आरोप झालेल्या दोन महिलांच्या मृत्यूच्या घटनेनंतर शहरात पाणीपुरवठ्याच्या सुरक्षिततेबाबत चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने केवळ हजरत खान चाळच नव्हे, तर शहरातील जुन्या जलवाहिन्यांचे सर्वेक्षण करून गळतीची ठिकाणे शोधावीत आणि तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
Post Views: 11