माढा : गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी व सीना नदीला आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते परंतु यावर्षी माढा तालुक्यासह परिसरात पावसाने चांगलीच ओढ घेतली आहे त्यामुळे शेतकऱ्यांची उभी पिक पाण्या वाचून जळून चालली आहेत. माढा तालुक्याला वर्धनीय असलेले उजनी धरण पुणे जिल्ह्यातील झालेल्या मुबलक पावसामुळे शंभर टक्के भरले आहे. त्यातून सीना माढा उपसा सिंचन योजनेत पाणी सोडल्यास शेतकऱ्यांचे होत असलेले नुकसान टाळता येऊ शकते. म्हणून सीना माढा उपसा सिंचन योजनेतून मनकर्णा नदी , चिंचोली व उपळाई (खुर्द) येथील ओढ्यांमध्ये तत्काळ पाणी सोडण्याच्या मागणीसाठी माढ्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य आनंदराव कानडे यांनी १० ऑगस्टला माढा तहसील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
यासंदर्भात त्यांनी भीमा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले आहे. मनकर्णा नदी व ओढ्यांमध्ये सीना-माढा उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडल्यास चिंचोली, सापटणे (भोसे), शिंदेवाडी, जाधववाडी (मा.), महातपूर, दारफळ, उंदरगाव, रोपळे (खुर्द), उपळाई (बुद्रुक), विठ्ठलवाडी, लोंढेवाडी, आदी गावांसह माढा शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटणार आहे. याचबरोबर शिंदेवाडी, वेताळवाडी आणि माढा परिसरातील विविध तलाव तातडीने भरावेत, अशीही मागणी यात करण्यात आली आहे.
वरील निवेदनाचा प्रशासनाने तत्काळ सकारात्मक निर्णय घेऊन सीना-माढा उपसा सिंचन योजनेतून मनकर्णा नदी व ओढ्यांमध्ये पाणी सोडावे, अन्यथा १० ऑगस्टपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा कानडे यांनी दिला आहे.
Post Views: 4