सोलापूर – दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे विठू माऊलीच्या दर्शन निमित्त येणाऱ्या वारकऱ्यांनी भाविकांना एसटीचा मोठा आधार मिळाला. यंदाच्या आषाढी वारीसाठी लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज झालेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) सोलापूर विभागाने यंदा उल्लेखनीय कामगिरीची नोंद केली आहे. विभागाने ४,६४३ विशेष फेऱ्यांद्वारे तब्बल २ लाख २१ हजार ९४८ वारकरी भाविकांची सुरक्षित व सुखरूप वाहतूक करत सेवा आणि नियोजनाचा उत्कृष्ट नमुना सादर केला.
वारी काळात सोलापूर विभागातील सर्व आगार प्रमुख, चालक, वाहक, यांत्रिक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करत भाविकांना वेळेवर, सुरक्षित आणि अखंड सेवा उपलब्ध करून दिली. या संयुक्त प्रयत्नांमुळे विभागाने ४ लाख ५१ हजार ९५८ किलोमीटर धाव घेत २ कोटी ६१ लाख ३१ हजार ६४ रुपये उत्पन्न मिळवले.
यंदाच्या आषाढी वारीत सोलापूर विभागाने गतवर्षीच्या तुलनेत १० हजार २९१ किलोमीटर अधिक धाव घेतली असून, २३ लाख ७४ हजार ४९० रुपयांनी अधिक महसूल मिळवला आहे. यावरून भाविकांचा एसटीवरील विश्वास अधिक दृढ झाल्याचे दिसून येते.याबाबत विभाग नियंत्रक अमोल गोंजारी यांनी सर्व आगार प्रमुख, चालक, वाहक, यांत्रिक आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
चौकट
आगारनिहाय कामगिरीत सोलापूर आगार आघाडीवर.
सोलापूर आगाराने ८० हजार किलोमीटर धाव घेत ४३.८४ लाख रुपये उत्पन्न मिळवले. त्यापाठोपाठ अक्कलकोट आगाराने ४०.५७ लाख, बार्शी आगाराने ३९.९८ लाख, करमाळा आगाराने ३२.९४ लाख, अकलूज आगाराने २२.६१ लाख, सांगोला आगाराने २२.०८ लाख, कुर्डूवाडी आगाराने २१.८९ लाख, मंगळवेढा आगाराने २०.७१ लाख, तर पंढरपूर आगाराने १६.६९ लाख रुपये उत्पन्न मिळवले.
कोट
प्रवाशांना दर्जेदार आणि विश्वासार्ह सेवा देण्यासाठी एसटी प्रशासन कटिबद्ध
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सर्व आगार प्रमुख, चालक, वाहक, यांत्रिक आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी अत्यंत नियोजनबद्ध व जबाबदारीने सेवा बजावली. त्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे लाखो वारकरी भाविकांना सुरक्षित व वेळेवर प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देता आली. भविष्यातही सोलापूर जिल्ह्यातील प्रवाशांना अधिक दर्जेदार आणि विश्वासार्ह सेवा देण्यासाठी एसटी प्रशासन कटिबद्ध असून, नागरिकांनी “एसटी संगे पर्यटन” योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही सोलापूर विभागाचे विभाग नियंत्रक अमोल गोंजारी यांनी केले.