सोलापूर : राज्यातील विद्यार्थ्यांसमोरील शैक्षणिक, तांत्रिक, वैद्यकीय, सामाजिक न्याय, कौशल्य विकास व आरोग्य क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) शिष्टमंडळाने राज्य शासनातील विविध मंत्र्यांची भेट घेऊन निवेदने सादर केली.
शिष्यवृत्ती, प्रवेश, शिक्षक भरतीसह विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आली आहे. संबंधितांकडून सकारात्मक आश्वासन देण्यात आले आहे, अशी माहिती प्रदेश मंत्री अथर्व कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शिष्टमंडळाने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह संबंधित राज्यमंत्र्यांची भेट घेतली.यावेळी परीक्षा व निकाल वेळेत जाहीर करणे, CET प्रवेश प्रक्रियेतील अडचणी दूर करणे, शिष्यवृत्तीचे वेळेत वितरण, शिक्षक भरती पूर्ण करणे, खासगी विद्यापीठांच्या शुल्कावर नियंत्रण, वैद्यकीय शिक्षणातील शुल्कवाढ रोखणे, इंटर्नना शासननिर्धारित स्टायपेंड, ग्रामीण आरोग्य सेवा सक्षम करणे, सामाजिक न्याय विभागाच्या योजना प्रभावीपणे राबविणे तसेच आयटीआयचे आधुनिकीकरण आणि विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुविधा वाढविण्याच्या मागण्या करण्यात आल्या.
सर्व मंत्र्यांनी संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत स्वतंत्र बैठक घेऊन टप्प्याटप्प्याने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लागेपर्यंत अभाविप सातत्याने पाठपुरावा करेल, तसेच गरज भासल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही अभाविपचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश मंत्री अथर्व कुलकर्णी यांनी दिली.
या पत्रकार परिषदेस उमेश वंजारी, नताशा कोत्तापल्ली आदी उपस्थित होते.
Post Views: 46