सोलापूर – राज्यभर सुरू असलेल्या ‘पवित्र’ शिक्षक भरती प्रक्रियेत सोलापूर जिल्ह्यातून एक महत्त्वाचे पत्र समोर आल्याने शिक्षक भरतीच्या पारदर्शकतेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद सोलापूर यांनी शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), पुणे यांना पाठविलेल्या पत्रात फेज-९ कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक भरतीसाठी यापूर्वी मंजूर करण्यात आलेल्या पाच संस्थांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवरून रद्द करण्याची विनंती करण्यात आली आहे.
२१ जुलै २०२६ रोजी पाठविण्यात आलेल्या या पत्रात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दूरध्वनी सूचनेचा संदर्भ देण्यात आला आहे. संबंधित संस्थांच्या जाहिराती सुरुवातीला पवित्र पोर्टलवर मंजूर करण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतर त्या जाहिराती पोर्टलवरून रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे भरती प्रक्रियेत नेमके काय घडले, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
या पत्रामुळे पवित्र भरती प्रक्रियेत सहभागी असलेल्या उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. संबंधित जाहिराती का रद्द करण्यात येत आहेत, त्यामागील प्रशासकीय किंवा तांत्रिक कारण काय आहे, याबाबत अधिकृत स्पष्टीकरण अद्याप समोर आलेले नाही. त्यामुळे भरती प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
शिक्षण विभागाकडून या पत्रानंतर अंतिम निर्णय काय घेतला जाणार, संबंधित संस्थांच्या जाहिराती कायम राहणार की रद्द होणार, तसेच त्याचा उमेदवारांवर काय परिणाम होणार, याकडे राज्यभरातील शिक्षक भरती इच्छुकांचे लक्ष लागले आहे.
चौकट
भरती प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा गोंधळ टाळण्यासाठी आणि उमेदवारांच्या हिताचा विचार करून शिक्षण संचालनालयाने या प्रकरणात लवकर स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी अपेक्षा उमेदवारांकडून व्यक्त केली जात आहे.
चौकट
पत्रानुसार श्री शिवाई शिक्षण प्रसारक मंडळ (गौडगाव), बार्शी शिक्षण प्रसारक मंडळ, श्री नर्मदेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ (माळेगाव), श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ (बार्शी) तसेच जय जगदंबा बहुउद्देशीय संस्था (सरजापूर) या संस्थांच्या शिक्षक पदांच्या जाहिरातींबाबत ही कार्यवाही करण्याची विनंती करण्यात आली आहे.