सोलापूर – राज्य शासनाच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ अभियानांतर्गत कासेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विविध महसुली सेवा, दाखले, प्रमाणपत्रे तसेच शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देत अनेक प्रलंबित कामांचा जागेवरच निपटारा करण्यात आल. या शिबिराचे उद्घाटन अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, जिल्हा परिषद सदस्य नेताजी खंडागळे आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर राबविण्यात येणाऱ्या या विशेष अभियानाचा उद्देश नागरिकांना शासकीय सेवा सुलभ आणि जलद पद्धतीने उपलब्ध करून देणे हा आहे. त्यानुसार कासेगाव येथे महसूल विभागासह विविध शासकीय विभागांनी एकत्रितपणे नागरिकांच्या समस्या सोडवत आवश्यक सेवा पुरवल्या.
या शिबिरात २५७ हयात दाखले, २४० युनिट वाढ, १२५ युनिट कमी, १० नवीन शिधापत्रिका, १७ संजय गांधी योजनेचे लाभ, ९६ उत्पन्न दाखले, २ अधिवास दाखले, १३ जातीचे दाखले, १० नॉन-क्रीमीलेयर प्रमाणपत्रे, १८ ईडब्ल्यूएस प्रमाणपत्रे, ६२ सातबारा उतारे, १२ सातबारा दुरुस्ती, ४ आठ-अ उतारे, १६४ आधार कार्ड सेवा, २० पशुवैद्यकीय सेवा, ६० कृषी विभागाच्या सेवा आणि १४६ आरोग्य विभागाच्या सेवा देण्यात आल्या.
याशिवाय महिला व बालकल्याण विभागामार्फत ३ बेबी केअर किट, २ लेक लाडकी योजना, ७ प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, २३ मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत एका लाभार्थ्याला २५ हजार रुपयांची मुदत ठेव (एफडी) प्रदान करण्यात आली. या उपक्रमामुळे नागरिकांची शासकीय कार्यालयांमध्ये होणारी धावपळ कमी झाली असून अनेक आवश्यक सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी नगरसेवक अनंत जाधव, उपविभागीय अधिकारी सुमित शिंदे, तहसीलदार किरण जमदाडे, पंचायत समिती सदस्य विजय राठोड, सरपंच यशपाल वाडकर, सोमनाथ पटणे, गटनेते बलवान गोतसुर्वे, पंचायत समिती सदस्य मळसिद्ध मुगळे, अंबिकाताई पाटील, सरपंच प्रशांत जाधव, राज साळुंखे, दशरथ कोळी, उपसरपंच शहाजन शेख, शंकर येणगुरे, मधुकर चिवरे, नाना भोसले, मनोज गुंड, प्रवीण चौगुले, दत्ता डांगे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
Post Views: 24