सोलापूर – “कोणते शिक्षण घेत आहोत यापेक्षा ते घेणारा विद्यार्थी आणि देणारे शिक्षक कसे आहेत, यावरच कोणत्याही विद्यापीठाचे खरे यश अवलंबून असते,” असे मोलाचे प्रतिपादन आयकर आयुक्त डॉ. नितीन रघुनाथ वाघमोडे यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या प्रांगणात झालेल्या 22व्या वर्धापन दिन व पुरस्कार वितरण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर हे होते, तर व्यासपीठावर प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत बसवराज दामा आणि पद्मश्री प्रा. डॉ. गणपती दादासाहेब यादव दूरस्थ प्रणालीद्वारे उपस्थित होते. पद्मश्री प्रा. डॉ. यादव यांनी दूरस्थ प्रणालीद्वारे मार्गदर्शन केले. परंतु त्याचे मार्गदर्शन तांत्रिक अडचणीमुळे ऐकावयास मिळाले नाही. यावेळी विद्यापीठाच्ा विद्यावार्ता या वार्तापत्राचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस वंदन करून करण्यात आली. प्रास्ताविक मानवविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. महेश खरात यांनी केले, तर वार्षिक अहवाल वाचन प्र-कुलसचिव अतुल लकडे यांनी केले. तेजस्विनी कांबळे आणि श्रुती देवळे यांनी सूत्रसंचालन केले.
भावी काळात वारकरी रिसर्च सेंटर सुरू करण्याचा मानस
विद्यापीठाच्या वाटचालीवर प्रकाश टाकताना कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर म्हणाले, “विद्यापीठ आता तारुण्यात पदार्पण करत असून, विविध नाविन्यपूर्ण प्रयोगातून ते एक रोल मॉडेल कसे ठरेल, यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. सद्यस्थितीत विद्यापीठात 154 स्किल डेव्हलपमेंटचे अभ्यासक्रम सुरू असून, भावी काळात असेच नवे अभ्यासक्रम सुरू करण्यासह वारकरी रिसर्च सेंटर स्थापन करण्याचा आमचा मानस आहे. तसेच यंदापासून इंजिनियरिंग फॅकल्टीचे बीटेक पदवीचे 9 अभियांत्रिकीचे अभ्यासक्रम सुरू होणार आहेत.”
देशमुख कुटुंबियाकडून ग्रंथसंपदा भेट
या कार्यक्रमा प्रसंगी विद्यापीठाचा प्रतिष्ठेचा व मानाचा जीवन गौरव पुरस्कार पंढरपूरचे इतिहासतज्ज्ञ गोपाळ मारुती देशमुख यांना आयकर आयुक्त डॉ. वाघमोडे यांच्या हस्ते देण्यात आला. 51 हजार रुपये, स्मृतीचिन्ह, गौरवपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप होते. मानपत्राचे वाचन डॉ. शिवाजी शिंदे यांनी केले. तसेच यावेळी उत्कृष्ट महाविद्यालय, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कारही प्रदान करण्यात आले. यावेळी देशमुख कुटुंबियांकडून विद्यापीठास ग्रंथसंपदा भेट देण्यात आली.
यांना प्रदान करण्यात आले पुरस्कार
जीवन गौरव पुरस्कार: गोपाळ मारुती देशमुख (पंढरपूर)
उत्कृष्ट महाविद्यालय: वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, सोलापूर
उत्कृष्ट प्राचार्य: डॉ. सत्यजित कांतीलाल शहा (हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स, सोलापूर)
उत्कृष्ट शिक्षक (विद्यापीठ): डॉ. प्रभाकर नागनाथ कोळेकर
उत्कृष्ट शिक्षक (महाविद्यालय): डॉ. बापू भीमा राऊत (वसुंधरा कला महाविद्यालय, सोलापूर)
उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी (वर्ग 1 व 2 – विद्यापीठ): नशीर बशीरमिया देशमुख
उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी (वर्ग 3 – विद्यापीठ): ज्ञानेश्वर अर्जुन निंबाळकर
उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी (वर्ग 3 – महाविद्यालय): अशोक लक्ष्मण कोरे (सी. बी. खेडगीज कॉलेज, अक्कलकोट)
उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी (वर्ग 4 – विद्यापीठ): शिवराज माणिकराव मिटकरी
उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी (वर्ग 4 – महाविद्यालय): विष्णू जयवंत वाघमारे (वसुंधरा महाविद्यालय, सोलापूर)



















