सोलापूर – आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी, स्वातंत्र्यासाठी आणि स्वाभिमानासाठी ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष करणारे क्रांतिवीर भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त सोलापूर येथील प्रकल्प अधिकारी कार्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. बुधवारी (दि. ११) सायंकाळी सहा वाजता झालेल्या या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी प्रकल्प अधिकारी धनंजय झाकरडे, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा नगरसेविका राजश्री चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते अनिल भीमराव चव्हाण, सांगली जिल्हाध्यक्ष बसवराज चव्हाण, बार्शी येथील बाळासाहेब भोसले, सचिन भोसले, तळे हिप्परगा येथील सामाजिक कार्यकर्ते मेघराज काळे, सोमनाथ पवार, रवी काळे, राजू काळे यांच्यासह प्रकल्प अधिकारी कार्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
भगवान बिरसा मुंडा यांनी अल्पायुष्यात आदिवासी समाजामध्ये अन्यायाविरोधात लढण्याची प्रेरणा निर्माण केली. जल, जंगल आणि जमिनीवरील आदिवासींच्या अधिकारांसाठी त्यांनी दिलेला लढा आजही समाजाला संघर्ष, संघटन आणि स्वाभिमानाचा संदेश देतो. त्यांच्या कार्याचे स्मरण करत आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, सामाजिक जागृती आणि हक्कांची जाणीव निर्माण करण्याची गरज यावेळी अधोरेखित झाली.
कोट
नावाला जयंती साजरी करण्यापुरते मर्यादित न राहता भगवान बिरसा मुंडा यांचे विचार समाजापर्यंत पोहोचवणे आणि त्यांच्या संघर्षातून प्रेरणा घेऊन आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी योगदान देणे, हाच या अभिवादन कार्यक्रमाचा मुख्य संदेश आहे.
– धनंजय झाकर्डे, प्रकल्प अधिकारी आदिवासी एकात्मिक विकास योजना