सोलापूर – शेतीला पूरक आणि अधिक उत्पन्न देणारा पर्याय म्हणून रेशीम उत्पादनाकडे शेतकऱ्यांनी वळण्याची गरज असून, त्यासाठी बाजारपेठ आणि विक्रीची प्रभावी व्यवस्था उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांनी केले.
यावेळी बाजार समितीचे उपसभापती सुनील कळके, संचालक नागना बनसोडे, प्रथमेश पाटील, केदार विभुते, गफ्फार चांदा, सचिव अतुलसिंग रजपूत, रेशीम अधिकारी विनीत पवार यांच्यासह विविध जिल्ह्यांतील रेशीम उत्पादक शेतकरी, खरेदीदार आणि रेशीम संचालनालयाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाच्या रेशीम संचालनालय, नागपूर आणि श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने हिरज (ता. उत्तर सोलापूर) येथे आयोजित रेशीम कोष नियंत्रित शेतमाल लिलावाचा शुभारंभ दिलीप माने यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रेशीम संचालनालय, पुणेचे सहाय्यक संचालक विठ्ठल फड होते.
यावेळी बोलताना दिलीप माने म्हणाले की, रेशीम उत्पादन हा कमी क्षेत्रात अधिक उत्पन्न देणारा व्यवसाय आहे. पारंपरिक शेतीसोबत रेशीम शेतीचा अवलंब केल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होऊ शकते. बाजार समितीच्या माध्यमातून रेशीम उत्पादकांना सक्षम बाजारपेठ उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे.
अध्यक्षीय भाषणात विठ्ठल फड यांनी रेशीम उद्योगाच्या वाढत्या संधींचा आढावा घेतला. सोलापूर बाजार समितीने रेशीम कोष लिलावाची सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे जिल्ह्यातील आणि परिसरातील उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पहिल्याच लिलावात शेतकऱ्यांना उत्साहवर्धक दर मिळाल्याचे चित्र दिसून आले. लिलावात २०१ किलो रेशीम कोषाची विक्री झाली. त्यामध्ये किमान ६४० रुपये, कमाल ७८० रुपये, तर सरासरी ७६५ रुपये प्रतिकिलो असा भाव मिळाला. या व्यवहारातून १ लाख ५३ हजार ८०३ रुपयांची उलाढाल झाली. स्पर्धात्मक लिलावामुळे उत्पादकांना योग्य बाजारभाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
रेशीम कोष लिलावामुळे सोलापूर विभागातील रेशीम उत्पादकांना स्थानिक स्तरावर विक्रीची विश्वासार्ह सुविधा उपलब्ध झाली असून, आगामी काळात या व्यवसायाला अधिक चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
Post Views: 55