बार्शी – शहरातील मंगळवार पेठ परिसरात बेकायदेशीररीत्या गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करुन गोमांसाची विक्री केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी रविवार दि. २ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता केलेल्या कारवाईत गोमांस, कत्तलीसाठी वापरलेली साधने तसेच रोख रक्कम असा एकूण ४६ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई सतीश चंद्रकांत उघडे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार मुकर्रम मन्नान सौदागर (वय ३७, रा. मंगळवार पेठ, बार्शी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हा गोवंश जातीच्या जनावरांची बेकायदेशीर कत्तल करुन त्याचे मांस विक्रीच्या उद्देशाने स्वतःच्या ताब्यात ठेवत असल्याचे पोलिसांच्या कारवाईत उघडकीस आले.
कारवाईदरम्यान पोलिसांनी ३ गोवंश जातीच्या मृत जनावरांचे अवशेष, ३ अर्धवट कापलेली मुंडकी, १२ कापलेले पाय व इतर अवयव, मांस कापण्यासाठी वापरण्यात आलेले ४ लोखंडी सत्तूर, एक वजनकाटा, वजन मापे, मांस टांगण्यासाठी वापरलेले लोखंडी अँगल व हुक तसेच गोमांस विक्रीतून मिळालेली रोख रक्कम असा एकूण ४६,६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ३२५ तसेच महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम, १९७६ मधील कलम ५(अ), ५(ड) आणि ९ अन्वये बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अभय माकणे, पोहेकॉ. प्रविण साठे, मपोहेकॉ.शबाना कोतवाल यांनी केली असून, प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार पांडुरंग मुंढे करीत आहेत.
Post Views: 8