सोलापूर – शहरातील वसंत विहार परिसरात श्री. रमेश रोडगी यांच्या घराच्या आवारात रात्री साडेबारा वाजता एक साप दुसऱ्या सापाला खात असल्याचे दुर्मिळ दृश्य पाहायला मिळाले. त्यांनी तात्काळ याची माहिती सर्पमित्र रविकिरण राजगुरू यांना दिली. मात्र ते शहराबाहेर असल्याने त्यांनी ही माहिती नाग फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष व सर्पमित्र अनिल अलदार यांना कळवली.
माहिती मिळताच अनिल अलदार यांनी घटनास्थळी धाव घेतली. पाहणी केली असता सुमारे साडेतीन फूट लांबीचा विषारी मण्यार हा सुमारे अडीच फूट लांबीच्या विषारी घोणस सापाला खात असल्याचे दिसून आले. निसर्गाच्या अन्नसाखळीत हस्तक्षेप होऊ नये याची काळजी घेत, अलदार यांनी कोणतीही घाईगडबड न करता आणि कसलाही व्यत्यय न आणता मण्यारला घोणस पूर्णपणे गिळून होईपर्यंत प्रतीक्षा केली. त्यानंतरच त्यांनी सुरक्षितपणे सापाचे रेस्क्यू केले. या दुर्मिळ घटनेचे त्यांनी आपल्या कॅमेऱ्यात चित्रीकरणही केले. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडत सर्पमित्र अनिल अलदार यांचे आभार मानले.
एका सापाने दुसऱ्या सापाला भक्ष्य बनविण्याच्या वर्तनाला शास्त्रीय भाषेत ओफिओफॅगी (Ophiophagy) असे म्हणतात. सापांना प्रत्येक वेळी सहज अन्न मिळतेच असे नाही. योग्य भक्ष्य शोधण्यासाठी त्यांना बराच काळ शोधाशोध करावी लागते आणि ऊर्जा खर्च करावी लागते. शिवाय एखादा साप दुसऱ्या सापाला खातो हा निसर्गाचा नियम असल्याने त्याच्यात हस्तक्षेप न करता अनिल अलदार यांनी वेट अँड वॉचची भूमिका घेऊन अगदी योग्य पद्धतीने रेस्क्यू पार पाडला.
*— सर्प अभ्यासक राहुल शिंदे*
साप एकमेकांना खाणे हा निसर्गाचा नियम आहे. अशा वेळी केवळ रेस्क्यूसाठी घाई करून हस्तक्षेप करणे योग्य नसते. जर हस्तक्षेप केला असता तर भीती व सुटकेपोटी मण्यार ने घोणस सापाला बाहेर काढले असते. त्यामुळे मी मण्यारला घोणस पूर्णपणे खाऊ दिला आणि त्यानंतरच सुरक्षितपणे त्याचे रेस्क्यू केले. वन्यजीवांच्या नैसर्गिक वर्तनाचा आदर राखणे हे प्रत्येक सर्पमित्राचे कर्तव्य आहे.
*— अनिल अलदार, संस्थापक-अध्यक्ष, नाग फाउंडेशन.*

Post Views: 14