सोलापूर – विडी घरकुल परिसरातील प्रभाग क्रमांक १० व ११ मधील नागरिकांच्या नागरी समस्या थेट जाणून घेऊन त्यांचे त्वरित निराकरण करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या ‘आपला दरबार’ या उपक्रमाचा पाचवा टप्पा रविवारी ललिता अंबिका देवी मंदिर येथे उत्साहात पार पडला. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, जलनिस्सारण, वीज तसेच इतर मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्न मांडले.
यावेळी नगरसेवक प्रथमेश कोठे यांनी नागरिकांच्या प्रत्येक तक्रारीची सविस्तर नोंद घेत संबंधित विभागांशी समन्वय साधून समस्यांचे प्राधान्याने निराकरण करण्यात येईल, असे आश्वासन दिले. मागील चार दरबारांमध्ये मांडण्यात आलेल्या बहुतांश प्रश्नांवर कार्यवाही करण्यात आली असून उर्वरित कामेही लवकरच पूर्ण केली जातील, अशी माहिती त्यांनी दिली.
‘आपला दरबार’ या उपक्रमामुळे नागरिकांना आपल्या परिसरातील समस्या थेट लोकप्रतिनिधींसमोर मांडण्याची संधी मिळत असून प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक प्रभावी होत आहे. त्यामुळे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागत असल्याने या उपक्रमाला परिसरातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचेही प्रथमेश कोठे यांनी नमूद केले.
या दरबारास नगरसेवक प्रथमेश कोठे यांच्यासह अजय पोन्नम, सतीश सीरसील्ला तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांच्या सहभागातून स्थानिक प्रश्न सोडविण्याचा हा उपक्रम अधिक प्रभावी ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
Post Views: 9