सांगोला – नगरपालिका हद्दीतील शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलासाठी शहरासह वाड्यावस्त्यांवर ग्रीन झोनमध्ये २ गुंठे क्षेत्र असलेल्यांना बांधकाम परवाना द्यावा, अन्यथा १५ ऑगस्ट रोजी उपोषण करणार असल्याचा इशारा माजी नगरसेवक सतिश सावंत यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
सांगोला नगरपालिका ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी क वर्ग नगरपालिका असून याचे क्षेत्रफळ ६८.८२ चौ.कि.मी आहे. यामध्ये १३ वाड्या वस्त्यांचा समावेश आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार सांगोला शहराची लोकसंख्या ४० हजारांपर्यत आहे. सध्या नगरपालिका २ ते ३ गुंठे ग्रीन झोनमध्ये क्षेत्र असलेल्यांना बांधकाम परवाना देत नसल्याने शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेमध्ये एकाही नागरिकाला याचा लाभ होत नाही. तरी शासनाने व नगरपालिका प्रशासनाने ग्रीन झोनमध्ये २ गुंठेच्या पुढे क्षेत्र असलेल्या ग्रीन झोनमध्ये पंतप्रधान आवास योजनेतून घर बांधणार्या नागरिकांना बांधकाम परवानगी व वापर परवाना देण्यात यावा. यामुळे नगरपालिकेच्या कर आकरणी व पाणीपट्टीतही वाढ होणार आहे. अन्यथा १५ ऑगस्ट रोजी सांगोला तहसील कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचे सतिश सावंत यांनी निवेदनात नमूद केले आहे.