पंढरपूर – पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर आणि भीमा खोऱ्यात झालेल्या दमदार पावसामुळे उजनी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी उशिरा रात्री उजनी धरणातून भीमा नदीपात्रात सुमारे १ लाख १० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे पंढरपूर शहरासह नदीकाठच्या गावांवर पुन्हा एकदा पुराचे सावट निर्माण झाले असून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
उजनी धरणात वाढलेल्या पाण्याच्या आवकेमुळे पुढील काही तासांत चंद्रभागा नदीच्या पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे पंढरपूर शहरातील सखल भागांतील नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परिस्थिती गंभीर झाल्यास यापू-र्वीप्रमाणे सुमारे १०० कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे.
पुणे जिल्ह्यातील मावळ परिसरासह भीमा खोऱ्यात मुसळधार पाऊस झाल्याने खडकवासला, चासकमान तसेच इतर धरणांतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या पाण्याची आवक उजनी धरणात वाढल्याने व्यवस्थापनानेही नदीपात्रात विसर्ग वाढविला आहे.
दरम्यान, पंढरपूर शहरातील व्यास नारायण झोपडपट्टी, अंबाबाई झोपडपट्टी तसेच गोपाळपूर-जुनापूल परिसरातील सखल भाग पाण्याखाली जाण्याची शक्यता लक्षात घेऊन नगरपालिका प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. नदीकाठच्या गावांनाही खबरदारीचा इशारा देण्यात आला असून आवश्यकतेनुसार सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यास तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
———————-
चौकट : ( स्नानासाठी जाण्यास मज्जाव )
चंद्रभागा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत असल्याने भाविकांनी नदीपात्रात किंवा घाटांवर स्नानासाठी जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी प्रमुख घाटांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून नदीकाठच्या परिसरावर महसूल, नगरपालिका, आपत्ती व्यवस्थापन आणि पोलीस प्रशासनाकडून सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.
——————–
चौकट : ( अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन )
प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले असून, नदीकाठच्या भागातील नागरिकांनी आवश्यक कागदपत्रे व जीवनावश्यक साहित्य सुरक्षित ठेवण्यासह प्रशासनाच्या सूचनांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Post Views: 13