अकलूज – लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या असाधारण साहित्यिक, सांस्कृतिक आणि सामाजिक योगदानाची दखल घेऊन त्यांना मरणोत्तर देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ प्रदान करण्यात यावा, अशी जोरदार मागणी माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील राजसिंह मोहिते-पाटील यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
खासदार मोहिते-पाटील यांनी पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्रात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्याचा आणि साहित्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. १९२० मध्ये सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या छोट्याशा गावातील अत्यंत गरीब दलित कुटुंबात जन्मलेल्या अण्णाभाऊंनी आपल्या विलक्षण प्रतिभा, अदम्य संकल्प आणि सामाजिक चेतनेच्या जोरावर भारतीय साहित्य व लोककलेच्या क्षेत्रात अढळ स्थान निर्माण केले.
अण्णाभाऊंनी १३ लोकनाट्ये, ३ नाटके, १३ कथासंग्रह, ३५ कादंबऱ्या, १ शाहिरी ग्रंथ, १५ पोवाडे, १ प्रवासवर्णन आणि ७ चित्रपट कथांचे लेखन केले आहे. त्यांची ‘फकीरा’ ही प्रसिद्ध कादंबरी मराठी साहित्यातील अमूल्य ठेवा मानली जाते, ज्याला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार मिळाला असून २७ भारतीय व परदेशी भाषांमध्ये तिचा अनुवाद झाला आहे.
खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी पत्रात नमूद केले की, अण्णाभाऊंचे साहित्य केवळ मराठी भाषेपुरते मर्यादित न राहता सामाजिक परिवर्तनाचे एक सशक्त माध्यम बनले. त्यांनी शोषित, पीडित, कष्टकरी, वंचित आणि उपेक्षित घटकांच्या जीवन-संघाषाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रभावीपणे मांडले. त्यांचे विचार भारतीय संविधानातील सामाजिक न्याय, समता, बंधुता आणि मानवी प्रतिष्ठेच्या आदर्शांना बळ देतात.
जनभावना आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे अद्वितिय राष्ट्रीय योगदान विचारात घेऊन त्यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ देऊन सन्मानित करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करावी, अशी नम्र विनंती खासदार मोहिते-पाटील यांनी या पत्राद्वारे केंद्र सरकारला केली आहे
Post Views: 9