अकलूज – शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील भरीव कार्याबद्दल केज तालुक्यातील वरपगावचे सुपुत्र व महाराष्ट्र राज्य प्राचार्य महासंघाचे अध्यक्ष आणि शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूजचे माजी प्राचार्य डॉ.आबासाहेब देशमुख यांना भारतीय स्वयंसेवी संस्था महासंघ (भारत) यांनी राजर्षी शाहू महाराज राष्ट्रीय पुरस्कार २०२६ चा पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.पुणे येथे महाराष्ट्र राज्याचे माजी उच्च शिक्षण संचालक व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.एस.एन.पठाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
ग्रामीण भागातील बहुजन समाजातील सर्वसामान्य गोरगरीब,शेतकरी,शेतमजूर व कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी ४५ वर्षापेक्षा अधिक काळ विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन,प्रोत्साहन व प्रेरणा देण्याचे काम केल्याबद्दल तसेच त्यांना वेळोवेळी आवश्यक ती सर्व मदत करून सामाजिक समानता व न्याय राष्ट्र बांधणीत भरीव योगदान दिल्याबद्दल हा बहुमान त्यांना देण्यात आला आहे.
यापूर्वीही त्यांनी १९८० पासून ग्रामीण भागात ग्रामस्वच्छता, साक्षरता अभियान, व्यसनमुक्ती,रक्तदान शिबिर, वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन,मतदार नोंदणी,महिला सक्षमीकरण
इत्यादी क्षेत्रात भरीव काम केल्यामुळे महाराष्ट्र शासनाने तीन वेळा राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे तसेच महिला सक्षमीकरण व महिला सुरक्षा यासाठी महाविद्यालय स्तरावर त्यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने शंकरराव मोहिते महाविद्यालय जिल्हास्तरीय एक लाख व विद्यापीठ स्तरीय दोन लाख रुपये तसेच गौरव चिन्ह देऊन त्यांच्या कार्याचे दखल घेतली आहे. महाराष्ट्र शासनाच्या औरंगाबाद जिल्हा आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीवर सेवाभावी संस्थेचे प्रतिनिधी तसेच पैठण तालुका साक्षरता अभियान समितीचा वातावरण निर्मिती प्रमुख म्हणून ही त्यांनी भरीव काम केलेले आहे.शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या कार्याचे दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने २००७ साली त्यांना राज्य शिक्षक पुरस्कार देऊन तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने २०१६ मध्ये उत्कृष्ट प्राचार्य म्हणून त्यांचा गौरव केला आहे तसेच मनशक्ती केंद्र लोणावळा,रोटरी क्लब अकलूज यासारख्या अनेक संस्थांनी वेळोवेळी त्यांना पुरस्कृत करून त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.सायन्स ऑलिंपियाड फाउंडेशन दिल्ली यांनीही आंतरराष्ट्रीय उत्कृष्ट प्राचार्य म्हणून रोख रुपये पंचवीस हजार व गौरव चिन्ह देऊन पुरस्कार देऊन त्यांचा दिल्ली येथे सन्मान केलेला आहे.हा पुरस्कार मिळाल्यामुळे डाॅ.आबासाहेब देशमुख त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Post Views: 8