सोलापूर : वाहतूक संघटना संयुक्त महासंघ, महाराष्ट्र राज्याच्या वतीने आज राज्यभर बाईक टॅक्सीविरोधात आंदोलन करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष रियाज भाई सय्यद यांच्या नेतृत्वाखाली सोलापूरसह जळगाव, नागपूर, सांगली, कोल्हापूर, लातूर, ठाणे, कल्याण, सातारा, पुणे, नांदेड, धाराशिव आणि संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी, एकाच वेळी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
महासंघाने निवेदनाद्वारे ओला, उबर, रॅपिडो यांसारख्या खासगी ॲपबरोबरच भारत सरकारच्या भारत टॅक्सी ॲपमध्ये बाईक टॅक्सीला दिलेल्या परवानगीचा तीव्र निषेध नोंदविला. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील लाखो रिक्षा व टॅक्सी चालकांच्या रोजगारावर गंभीर परिणाम होणार असून, शासनाने २०१७ पासून खुले रिक्षा परवाने देऊन व्यवसायात आणलेल्या आणि लाखो रुपयांचे कर्ज घेऊन रिक्षा खरेदी केलेल्या युवकांचे भवितव्य धोक्यात येणार असल्याचे महासंघाने म्हटले आहे.
महासंघाने सरकारकडे खासगी व सरकारी सर्व ॲपमधील बाईक टॅक्सी सेवा तात्काळ बंद करण्याची, रिक्षा व टॅक्सी चालकांच्या रोजगाराचे संरक्षण करणारे ठोस धोरण जाहीर करण्याची आणि चालक संघटनांशी चर्चा केल्याशिवाय कोणताही निर्णय न घेण्याची मागणी केली आहे.
प्रदेशाध्यक्ष रियाज भाई सय्यद यांनी सांगितले की, “रिक्षाचालकांच्या रोजगारावर गदा आणणारा कोणताही निर्णय महासंघ सहन करणार नाही. शासनाने तात्काळ बाईक टॅक्सीचा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा राज्यभर अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल.”
या आंदोलनात सर्व जिल्ह्यांतील महासंघाचे पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष आणि मोठ्या संख्येने रिक्षा व टॅक्सी चालक सहभागी झाले.
Post Views: 8