सोलापूर – शिक्षणमहर्षी स्वर्गीय विष्णुपंत (तात्यासाहेब) कोठे यांच्या ८९ व्या जयंतीनिमित्त संभाजीराव शिंदे प्रशाला, विडी घरकुल येथे शहरस्तरीय भव्य चित्रकला स्पर्धेचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देत सर्जनशीलतेला चालना देणारा हा उपक्रम ठरला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या सदस्या डॉ.राधिका चिलिका उपस्थित होत्या.
यावेळी प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक नागेश बंडे, मार्गदर्शिका तनुजा मारपल्ली, कनिष्ठ महाविद्यालयाचे विभागप्रमुख नवनाथ व्हटकर तसेच प्रशालेचे माजी चित्रकला शिक्षक ज्ञानेश्वर कांबळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता माता सरस्वती आणि शिक्षणमहर्षी स्व. विष्णुपंत कोठे यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर डॉ. राधिका चिलिका यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत कला, कल्पकता आणि सर्जनशील विचार यांचे महत्त्व अधोरेखित केले. अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला नवी दिशा मिळते, असे त्यांनी सांगितले.
या स्पर्धेत पूर्व विभागातील तब्बल ३५ शाळांमधील ४८५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेत विविध विषयांवर आकर्षक चित्रे साकारत आपल्या कलागुणांचे प्रभावी दर्शन घडविले. विद्यार्थ्यांसह उपस्थित शिक्षक आणि पालकांसाठी अल्पोपहार व चहापानाचीही व्यवस्था करण्यात आली होती.
स्पर्धेचे परीक्षण माजी कलाशिक्षक ज्ञानेश्वर कांबळे यांनी केले. विजेत्यांसाठी प्रथम क्रमांकास रु. १,००१, ट्रॉफी व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकास रु. ७५१, ट्रॉफी व प्रमाणपत्र, तर तृतीय क्रमांकास रु. ५०१, ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात येणार असून, सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांमधील कला संवर्धन, सृजनशीलता आणि आत्मविश्वास वाढविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.
Post Views: 10