बार्शी – बार्शी शहरातील सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना ध्वनीक्षेपकाचा वापर करुन मोठ्या आवाजात डीजे वाजविणे तसेच असभ्य हावभाव करत नृत्य करण्याच्या प्रकाराविरोधात बार्शी शहर पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणी फिर्यादी पोकॉ. कादर तांबोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन डीजे ऑपरेटर आकाश नागनाथ मस्के (रा. नवीन रेल्वे स्टेशन रोड, बार्शी) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २२३ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम १३१ व १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ९ वाजता बार्शी शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी शहरात गस्त घालत असताना सोमवार पेठेतील तीन कंदील चौक येथे विनापरवाना ध्वनीक्षेपक सुरु असल्याचे निदर्शनास आले. यावेळी पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र जमून डीजेवर गाणी लावत असभ्य हावभाव करत नृत्य करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
याबाबत डीजे ऑपरेटर आकाश मस्के याच्याकडे ध्वनीक्षेपक वापरण्याची सक्षम प्राधिकाऱ्याची परवानगी आहे का, याची चौकशी केली असता त्याने परवाना घेतला नसल्याचे पोलिसांना सांगितल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, सोलापूर जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी ३ ऑगस्ट रोजी आदेश जारी करुन ५ ऑगस्ट ते १९ ऑगस्ट या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम ३७(१)(३) अन्वये आदेश लागू केला आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
रस्त्यावर केक कापणे, फटाके उडविणाऱ्यांवरही
कारवाई –पोलीस निरीक्षक गणेश कुंभार
दरम्यान, बार्शी शहरातील सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस साजरा करण्याच्या नावाखाली रस्त्यावर दुचाकी आडव्या लावणे, दुचाकीवर केक कापणे, फटाके उडविणे तसेच सार्वजनिक शांतता व वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे.
बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारचे गैरकृत्य आढळून आल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करुन गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा पोलीस निरीक्षक गणेश कुंभार यांनी दिला आहे.
शहरातील सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी बेशिस्तपणा करु नये तसेच कोणत्याही प्रकारे कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.