बार्शी – तालुक्यातील पांगरी गावचे सुपुत्र, लोकव्याख्यानकार व लेखक प्रा. विशाल गरड यांना अटल फाउंडेशनच्यावतीने देशपातळीवर प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘अटल भूषण पुरस्कार – २०२६’ जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण दि. १९ सप्टेंबर २०२६ रोजी नवी दिल्ली येथील भव्य ‘भारत मंडपम’ सभागृहात विशेष मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
गेल्या १५ वर्षांपासून प्रा. गरड व्याख्यान, लेखन आणि प्रबोधनाच्या माध्यमातून समाजजागृतीचे कार्य सातत्याने करत आहेत. महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये त्यांनी २,००० हून अधिक प्रभावी व्याख्याने देत लाखो युवक, विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि नागरिकांपर्यंत सकारात्मक विचार पोहोचवले आहेत.
प्रा. गरड यांची आतापर्यंत ६ पुस्तके प्रकाशित झाली असून आणखी २ पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. प्रभावी वक्ते आणि लेखक म्हणून ओळख असलेल्या प्रा. गरड यांनी चित्रकार, कवी, दिग्दर्शक, कॅलिग्राफर, मेंटर, कॉर्पोरेट ट्रेनर आणि कौन्सिलर अशा विविध क्षेत्रातही आपला ठसा उमटवला आहे.
भाषण आणि लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे त्यांचे कार्य गेल्या दीड दशकांपासून अखंडपणे सुरू आहे. प्रबोधन, सामाजिक बांधिलकी आणि वैचारिक जनजागृती क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत अटल फाउंडेशनने त्यांची ‘अटल भूषण पुरस्कार’ यासाठी निवड केली आहे.
प्रा. विशाल गरड यांच्या या उल्लेखनीय यशामुळे बार्शी तालुक्याचे नाव देशपातळीवर उजळले असून साहित्य, व्याख्यान आणि प्रबोधन क्षेत्रातील कार्यकर्त्यांकडून त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात येत आहे.
Post Views: 19