सोलापूर : दर्श अमावस्येनिमित्त शहर परिसरात कोहळ्याच्या विक्रीला चांगलीच रंगत आली असून, ठिकठिकाणी रस्त्यांच्या बाजूला कोहळे विक्रीची छोटी दुकाने सजली आहेत. विविध आकारांचे कोहळे विक्रीसाठी मांडण्यात आल्याने रस्त्यालगतचे हे चित्र नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. दर्श अमावस्येला कोहळ्याला विशेष महत्त्व असल्याने नागरिकांकडून या दिवशी कोहळ्याची खरेदी केली जाते. त्यामुळे ग्रामीण भागातून आणलेले कोहळे शहरातील विविध चौक, बाजारपेठा आणि रस्त्यांच्या कडेला विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत.
सकाळपासूनच नागरिकांची कोहळे खरेदीसाठी लगबग सुरू झाली असून, यामुळे छोट्या विक्रेत्यांनाही चांगला व्यवसाय मिळत आहे. पारंपरिक श्रद्धा आणि सण-उत्सवाच्या निमित्ताने शहरातील बाजारपेठेतही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.





















