सोलापूर – अक्कलकोट तालुक्यातील बबलाद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वर्गखोलीचे छताचे प्लास्टर कोसळून १३ विद्यार्थी आणि दोन शिक्षक जखमी झाल्याच्या घटनेची जिल्हा परिषदेने गंभीर दखल घेतली आहे. या घटनेनंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी बुधवारी बबलाद येथील शाळेला भेट देऊन पाहणी केली. तसेच घटनेप्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख आणि गटशिक्षणाधिकारी यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या असून, खुलासा सादर करण्यासाठी एक दिवसाची मुदत देण्यात आली आहे.
बबलाद शाळेच्या वर्गखोलीचा प्लास्टर मंगळवारी अचानक कोसळला. यावेळी वर्गात असलेल्या विद्यार्थ्यांसह दोन शिक्षकांना दुखापत झाली. घटनेनंतर जखमी विद्यार्थ्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्व जखमी विद्यार्थ्यांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या घटनेत प्रशासनाच्या पातळीवर कोणतीही कसूर झाली आहे का, याची चौकशी करण्यात येत आहे. शाळेची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून अहवाल मागविण्यात आला आहे. शाळेचे मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख आणि गटशिक्षणाधिकारी यांना नोटिसा बजावून त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात आला आहे. त्यांचा खुलासा प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे जैन यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या घटनेत केवळ शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांवरच कारवाई न करता संबंधित ठेकेदार तसेच बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांचीही जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे. बांधकामाची गुणवत्ता, देखरेख आणि शाळेच्या इमारतीची स्थिती याबाबतही तपासणी केली जाणार असल्याचे जैन यांनी सांगितले.
सोलापूर जिल्ह्यात तब्बल १ हजार ३४५ शाळा खोल्या धोकादायक असल्याची माहितीही पत्रकार परिषदेत समोर आली. विशेष म्हणजे बबलाद येथील ज्या शाळेच्या खोलीचा प्लास्टर कोसळला, ती खोली धोकादायक शाळा खोल्यांच्या यादीत नव्हती. त्यामुळे धोकादायक म्हणून नोंद नसलेल्या इमारतीचीही प्रत्यक्ष स्थिती तपासण्याची गरज निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात धोकादायक घोषित करण्यात आलेल्या शाळा खोल्यांपैकी १ हजार १६५ खोल्या पाडण्यात आल्या आहेत. मात्र अद्याप ४८१ शाळा खोल्या पाडण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या खोल्यांचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आव्हान जिल्हा परिषदेसमोर आहे.या पत्रकार परिषदेला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य आणि उपाध्यक्ष इंद्रजीत पवार उपस्थित होते.
कोट
पाडकामाची प्रक्रिया किचकट
शाळेत विद्यार्थी साडीने झोका खेळत होते. त्यावेळी प्लास्टर पडून ही दुर्घटना घडली. दुखापतग्रस्त विद्यार्थ्यांसह दोन शिक्षकांवर उपचार सुरू आहेत. अशा परिस्थितीत धोकादायक शाळा खोली पाडण्यासाठीची प्रशासकीय प्रक्रिया किचकट असल्याने अनेक ठिकाणी पाडकामाला विलंब होत असल्याचेही जैन यांनी स्पष्ट केले. ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आणि नियमांमध्ये शिथिलता देण्यासाठी राज्य शासनाकडे विनंती करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत शाळांच्या इमारतींची तपासणी आणि आवश्यक ती कार्यवाही करण्यावर भर दिला जाणार असल्याचे जैन यांनी सांगितले.
Post Views: 5