पंढरपूर – मंगळवेढा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या बलात्कार, ब्लॅकमेलिंग आणि आयटी ॲक्टअंतर्गतच्या गंभीर गुन्ह्यात सांगोला (मेडशिंगी) येथील किरण आण्णासो घोडके (वय २९) याला पंढरपूर न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ओंकार देशमुख यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.
या प्रकरणातील पीडित महिलेची इन्स्टाग्रामवर किरण घोडके याच्याशी ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्यात व्हिडिओ कॉल, चॅटिंग, संभाषण सुरू होते. दरम्यान, किरण याने कॉलचे स्क्रीनशॉट काढून विवस्त्र फोटो पती व नातेवाइकांत व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला ब्लॅकमेल केले गेले. १३ जून २०२६ रोजी दुपारी तक्रारदार एकटी असताना किरण याने तिच्या घरी येऊन बदनामीच्या धमकीखाली जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले, अशा आशयाची फिर्याद तिने मंगळवेढा पोलिसांत दाखल केली होती.
या गुन्ह्यात अटकेच्या भीतीने संशयित किरण घोडके याने ॲड. विजयकुमार जाधव यांच्या मार्फत अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. अर्जदाराच्या वकिलांनी न्यायालयात स्पष्ट केले की, दोघांमध्ये गेल्या ४ वर्षांपासून संमतीने प्रेमसंबंध होते. फोन कॉल, व्हॉट्सॲप चॅट व भेटी दोन्ही बाजूंच्या इच्छेनेच होत होत्या. कौटुंबिक किंवा वैयक्तिक वादानंतर आरोपीला खोट्या प्रकरणात अडकवण्यात आले आहे.
दोन्ही बाजूंचे युक्तिवाद आणि तपास कागदपत्रे पडताळल्यानंतर, आरोपी तपासास सहकार्य करण्यास तयार असल्याने व जप्ती शिल्लक नसल्याने न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला. अर्जदाराच्या वतीने ॲड. विजयकुमार जाधव, ॲड. अमोल आवताडे आणि ॲड. ऋषिकेश सातपुते यांनी काम पाहिले.
Post Views: 14