सोलापूर – मराठा समाज सेवा मंडळ सोलापूर संचलित छत्रपती शिवाजी संकुलात भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन अत्यंत उत्साहात आणि देशप्रेमाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष तथा माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या हस्ते संकुलात दिमाखात ध्वजारोहण करण्यात आले.
प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका उषा गोकुळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत केले. प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुजाता जुगदार यांनी एनसीसीच्या विद्यार्थ्यांना शपथ दिली. माजी उपमुख्याध्यापक अनिल लोंढे आणि विद्यार्थ्यांनी ‘वंदे मातरम्’, राष्ट्रगीत, राज्यगीत आणि झेंडा गीत सादर केले. तसेच गार्गी चव्हाण हिने लाठीकाठीचे लाजवाब प्रात्यक्षिक दाखवले. प्राथमिक व माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर सुंदर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
संकुलातील आधुनिक व सुसज्ज अशा नवीन ‘बालक मंदिर विभागाचे’ उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष मनोहर सपाटे, नगरसेविका श्रीदेवी फुलारे आणि नगरसेवक चेतनभाऊ नरोटे यांच्या हस्ते थाटात झाले. अध्यक्ष मनोहर सपाटे यांच्या हस्ते संकुलातील गुणवंत विद्यार्थी कृष्णा यादव, सिद्धार्थ साखरे, गायत्री साळुंखे आणि राष्ट्रीय खेळाडू अन्वर शेख यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
या सोहळ्याला नगरसेविका मनोरमाताई सपाटे, श्रीदेवी फुलारे, नगरसेवक चेतनभाऊ नरोटे, वल्लभ बांगरिया, जनरल सेक्रेटरी प्रा. महेश माने, सेक्रेटरी राजेंद्र शिंदे, प्राथमिक शालेय समिती चेअरमन विनायकराव पाटील, संचालिका रेखाताई सपाटे, अलका सुरवसे, संचालक अशोक चव्हाण, सुरेश पवार, महादेव गवळी, पूर्व प्राथमिक प्रमुख मुकुंद जाधव, ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या मंजुश्री पाटील, रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन मोटे, मुख्याध्यापिका सुजाता जुगदार, उषा गोकुळे, उपमुख्याध्यापक श्रीपादराव जगदाळे, पर्यवेक्षक सुरेश जगताप, किरण देशमुख आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारिका पंडित आणि शोभा चव्हाण यांनी केले.
——

























