सोलापूर : भारतीय संविधानाचे महत्त्व, लोकशाही मूल्ये आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने पंचशील प्राथमिक मराठी विद्यालय व पंचशील माध्यमिक प्रशालेत २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
मानवता विकास मंडळाचे अध्यक्ष श्रीशैल रणधीरे, संस्थेचे विश्वस्त सिद्धार्थ रणधीरे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका महामाया रणधीरे तसेच माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक एम. एम. यलगुंडे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांकडून संविधानाचे सामूहिक वाचन करण्यात आले.
संविधान जनजागृतीचा संदेश देणारे घोषवाक्य हातात घेऊन विद्यार्थ्यांनी ढोलपथकाच्या साथीने प्रभात फेरी काढली. या फेरीतून संविधानाचे महत्त्व, राष्ट्रीय एकात्मता आणि नागरिकांच्या हक्क व कर्तव्यांविषयी जनजागृती करण्यात आली.दुसऱ्या सत्रात प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी विविधतेतून एकता हा संदेश देणारे संविधानावर आधारित नृत्य सादर केले. तर माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानातील मूलभूत मूल्ये आणि लोकशाही तत्त्वांवर प्रकाश टाकणारे प्रभावी पथनाट्य सादर केले. या पथनाट्यास मिलिंद ठोंबरे यांनी मार्गदर्शन केले.यानंतर चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. प्रशालेचे नरळे यांनी संविधानाचे महत्त्व विशद करणारे मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन बाळासाहेब चटे सर यांनी केले. शेवटी विद्यार्थ्यांनी मानवी साखळी तयार करून संविधानातील एकता, समता आणि बंधुतेचा संदेश दिला.