सोलापूर – क्षयरोगावरील उपचार केवळ औषधांपुरते मर्यादित न राहता रुग्णांना पुरेसा व सकस आहार मिळणेही आवश्यक आहे. ही गरज लक्षात घेऊन फिनिक्स केअर फाउंडेशनने जिल्ह्यातील उपचाराधीन ५० क्षयरुग्णांना दत्तक घेत पोषण आहाराच्या फूड बास्केटचे वाटप केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या हस्ते या फूड बास्केटचे वितरण करण्यात आले.
क्षयरोगाच्या उपचारादरम्यान रुग्णांची शारीरिक ताकद आणि प्रतिकारशक्ती टिकवण्यासाठी पौष्टिक आहार महत्त्वाची भूमिका बजावतो. मात्र, आर्थिक परिस्थितीमुळे अनेक रुग्णांना उपचारांसोबत आवश्यक पोषण मिळणे कठीण होते. ही बाब लक्षात घेऊन फिनिक्स केअर फाउंडेशनने सामाजिक बांधिलकीतून ५० रुग्णांची जबाबदारी स्वीकारली आहे.या उपक्रमातून उपचाराधीन रुग्णांना आवश्यक पोषण आहार उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे औषधोपचारासोबत रुग्णांच्या आरोग्याला पोषणाचीही साथ मिळणार आहे.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी क्षयरुग्णांच्या उपचारात पोषण आहाराचे महत्त्व स्पष्ट केले. “क्षयरुग्णांनी नियमित औषधोपचारासोबत सकस आणि पौष्टिक आहार घेणे गरजेचे आहे. समाजातील दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था, उद्योजक आणि विविध संस्थांनी पुढाकार घेऊन उपचाराधीन क्षयरुग्णांना दत्तक घ्यावे. फूड बास्केटच्या माध्यमातून त्यांच्या उपचाराला पोषणाची साथ द्यावी,” असे आवाहन त्यांनी केले.
क्षयरोग निर्मूलनासाठी शासनाकडून विविध स्तरांवर प्रयत्न सुरू असताना सामाजिक संस्थांचा सहभाग या मोहिमेला अधिक बळ देणारा ठरत आहे. त्यामुळे अशा उपक्रमांची व्याप्ती वाढवून अधिकाधिक रुग्णांपर्यंत पोषणाची मदत पोहोचविण्याची गरज आहे.
या कार्यक्रमास फिनिक्स केअर फाउंडेशनच्या तनुजा शेख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. मोहन शेगर, वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद अभिवंत, तसेच विजय शेगर, राजकिरण भुताळे, युसूफ चौधरी, नागराज येळसंगी आदी उपस्थित होते.
Post Views: 33