बार्शी – बार्शी शहरातील परंडा रोड परिसरात हरवलेला सुमारे १९ हजार रुपये किंमतीचा मोबाईल दोन तरुणांना सापडल्यानंतर त्यांनी तो स्वतःकडे न ठेवता बार्शी शहर पोलीस ठाण्यात जमा केला. स्वराज राजेंद्रसिंह लोखंडे आणि यश धीरजशकुमार कुंकुलोळ या दोन मित्रांनी दाखवलेल्या या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
बार्शी येथील निरंजन दत्तात्रय भोसले यांच्या पत्नी प्रतीक्षा भोसले यांचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल २० ऑगस्ट रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास परंडा रोड परिसरात हरवला होता. सदर मोबाईलमध्ये जिओ कंपनीचे सिमकार्ड वापरले जात होते.
दरम्यान, स्वराज लोखंडे आणि यश कुंकुलोळ या दोघांना परंडा रोड परिसरात हा मोबाईल सापडला. मोबाईल कोणाचा आहे, याची त्यांनी परिसरात चौकशी केली; मात्र मालकाबाबत माहिती मिळाली नाही. त्यानंतर कोणताही गैरवापर न करता त्यांनी थेट बार्शी शहर पोलीस ठाणे गाठून सापडलेला मोबाईल ठाणे अंमलदारांकडे जमा केला.
पोलिसांनी मोबाईलच्या क्रमांकावरुन संबंधित व्यक्तीचा शोध घेण्यास सुरुवात केली. यावेळी मोबाईलचे मालक निरंजन भोसले असल्याचे समोर आले. त्यानंतर निरंजन भोसले पोलीस ठाण्यात आले. आवश्यक कागदपत्रे व सरकारी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना त्यांच्या पत्नीचा हरवलेला मोबाईल परत करण्यात आला.
सापडलेल्या मोबाईलचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर न करता तो पोलिसांकडे जमा करुन तो त्याच्या मालकापर्यंत पोहोचविणाऱ्या स्वराज लोखंडे आणि यश कुंकुलोळ यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे. त्यांच्या या कृतीतून समाजात आजही प्रामाणिकपणा आणि माणुसकी जिवंत असल्याचा संदेश मिळाला आहे.