बार्शी – विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणि सर्जनशीलतेला व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने जिजाऊ गुरुकुल, खांडवी येथे २५ ऑगस्ट राखी मेकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आकर्षक व नाविन्यपूर्ण राख्या तयार केल्या.
रिबन, लोकर, मोती, बटन, कागद, कापडाचे तुकडे, आईस्क्रीम स्टीक, कार्डबोर्ड तसेच जुन्या सजावटीच्या साहित्याचा वापर करुन विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक, तिरंगा, पारंपरिक, मोर, प्रेम व काळजी आणि नाविन्यपूर्ण अशा विविध संकल्पनांवर राख्या साकारल्या.
स्पर्धेचे परीक्षण संस्थेच्या सचिवा वर्षाताई घाडगे आणि रेश्मा शेळके यांनी केले. सर्जनशीलता, नीटनेटकेपणा, नाविन्य आणि सादरीकरण या निकषांवर राख्यांचे परीक्षण करण्यात आले.
कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संभाजी घाडगे, प्रशासकीय अधिकारी किशोर कदम, शिंदे मेजर तसेच सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे कौतुक करुन त्यांना प्रोत्साहन दिले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख सुवर्णा देवकर आणि पारस कांबळे यांच्यासह सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.