सांगोला – विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास, सकारात्मक विचारसरणी, शिस्त आणि प्रभावी संवादकौशल्य विकसित करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या यशामध्ये केवळ शैक्षणिक ज्ञान महत्त्वाचे नसून, त्यासोबत व्यक्तिमत्त्व विकासाचीही तितकीच गरज आहे. स्वतःमधील गुण-दोष ओळखून सातत्याने त्यावर काम केल्यास व्यक्तिमत्त्व अधिक प्रभावी बनते. वेळेचे नियोजन, योग्य निर्णयक्षमता, नेतृत्वगुण आणि इतरांशी सकारात्मक संवाद ही यशस्वी व्यक्तिमत्त्वाची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. व्यक्तिमत्त्व हे घडवावे लागते ते विकत घेता येत नाही असे प्रा.राजेंद्र पाटील यांनी सांगत विद्यार्थ्यांना स्वतःच्या विकासासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करण्याचे आवाहन केले. ते फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च, सांगोला येथे मेकॅनिकल व सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्त्व विकास या विषयावर आयोजित व्याख्यानात बोलत होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॅ.संजय पवार यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.सोनाली पाटील यांच्यासह सिव्हिल व मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.