सोलापूर : शहरातील महत्त्वाच्या पार्क चौपाटी परिसरातील वाढलेल्या अनधिकृत विक्रेत्यांवर आज शुक्रवारपासून सोलापूर महानगरपालिका कारवाई करणार आहे. पार्क स्टेडियमसमोरील परिसरात घोडे-उंट सफारी, टॅटू डिझाईन तसेच विविध प्रकारच्या हातगाड्यांद्वारे अनधिकृत व्यवसाय केला जात असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे अशा विक्रेत्यांना परिसर रिकामा करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त तथा भूमी व मालमत्ता विभागाच्या नियंत्रण अधिकारी वीणा पवार यांनी दिली.
महापालिका अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी आज पार्क चौपाटी परिसराची पाहणी केली. संबंधितांना सूचनाही दिल्या. पार्क चौपाटी परिसरात केवळ १७ मूळ गाडीधारकांना सोडून इतरांवर कारवाई करण्यात येणार आहे. अनेक अनधिकृत विक्रेत्यांनी परिसरात व्यवसाय सुरू केला आहे. काहींनी पत्रकार कक्षासमोरील जागेवरही अतिक्रमण केल्याचे निदर्शनास आले आहे.महापालिकेने गुरुवारी सायंकाळी संबंधित विक्रेत्यांना कडक सूचना देऊन या ठिकाणी कोणतीही गाडी, हातगाडा अथवा विक्रीचे साहित्य न लावण्याचे आदेश दिले. यापुढे अनधिकृत विक्रेते आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करून साहित्य जप्त करण्यात येणार आहे.
दरम्यान, हा परिसर ‘नो पार्किंग झोन’ असल्याने नागरिकांनीही येथे वाहने उभी करू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे. वाहन पार्किंगची व्यवस्था पत्रकार भवनासमोरील बाजूस करण्यात आली असल्याचे पवार यांनी सांगितले. नागरिकांनी वाहतूक व्यवस्थेला सहकार्य करावे आणि अनधिकृत विक्रेत्यांनी परिसरात व्यवसाय करू नये, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
Post Views: 11