माढा – सीना-माढा उपसा सिंचन योजनेचे पाणी उपळाई बुद्रुक गावाला मिळावे, या मागणीसाठी गावातील शेतकऱ्यांनी मंगळवारी (ता. १) दुपारपासून क्रांती चौकात अन्नत्याग आमरण उपोषण सुरू केले आहे. गावात प्रत्यक्ष पाणी पोहोचेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
उपळाई बुद्रुक परिसरात सध्या पाणीटंचाईची तीव्रता वाढली असून, नागरिकांसह जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. सीना-माढा उपसा सिंचन योजना कार्यान्वित असतानाही गावाला अपेक्षित पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
यापूर्वीही पाण्याच्या मागणीसाठी उपळाईकरांकडून आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पाणी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, आश्वासनानंतरही प्रत्यक्ष पाणी न मिळाल्याने शेतकऱ्यांनी पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास लघु पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता मंजुनाथ तुंबळ यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाणी सोडण्याबाबत आश्वासन दिले. मात्र, चर्चेनंतरही ठोस निर्णय न झाल्याने आंदोलनकर्त्यांनी उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला.
या आंदोलनाला ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद मिळत असून, पंचायत समिती सदस्य प्रा. नितीन झाडबुके, माजी पंचायत समिती सदस्य दीपक देशमुख तसेच सामाजिक कार्यकर्ते शंभू साठे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दिला.
सज्जन गोरे, हरी बेडगे, दत्तात्रय शिंदे, ईसाक काझी, संजय आवारे, वैभव गोरे, सोमेश्वर शेंडे, पप्पू डुचाळ, विश्वंभर झाडबुके व शिवानंद झाडबुके यांनी अन्नत्याग आमरण उपोषण सुरू केले आहे.
दरम्यान, सीना-माढा योजनेचे पाणी परिसरात उपलब्ध असतानाही उपळाई बुद्रुकला त्याचा लाभ मिळत नसल्याने पाणीवाटपाच्या नियोजनावरच शेतकऱ्यांनी सवाल उपस्थित केला आहे. प्रशासनाकडून आता केवळ आश्वासन न देता प्रत्यक्ष पाणी उपलब्ध करून देण्यासाठी कोणती पावले उचलली जातात, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
Post Views: 11