माढा – जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी माढा शहर व परिसरातील सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवार ३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता माढा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
जरांगे पाटील गेल्या चार दिवसांपासून उपोषणाला बसले असून, त्यांची प्रकृती खालावत असल्याने शासनाने तातडीने त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. शासनाने या उपोषणाची दखल घेऊन मराठा समाजाला न्याय द्यावा; अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
आंदोलनादरम्यान रस्त्यावर टायर पेटवून शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला. अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या उपोषणाची शासनाने अद्याप गांभीर्याने दखल घेतलेली नसल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला. उपोषणामुळे जरांगे पाटील यांच्या प्रकृतीला काही बरे-वाईट झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील, असा इशाराही देण्यात आला.
मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य करून शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली.
या रास्ता रोको आंदोलनात सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
चौकट…..
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची शासनाने तातडीने दखल घ्यावी….
आमचे दैवत, संघर्षयोद्धा मनोज दादा जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता अनेक वेळा उपोषणाचे हत्यार उपसले आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीवरही त्याचा विपरीत परिणाम होत आहे.
गेल्या चार दिवसांपासून ते उपोषणाला बसले असून, दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत आहे. त्यामुळे शासनाने या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेऊन त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा आणि मराठा समाजाला न्याय द्यावा.
मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीचा विचार करून शासनाने विलंब न करता योग्य तो निर्णय घेणे गरजेचे आहे. त्यांच्या उपोषणामुळे त्यांच्या जीवाला कोणताही धोका निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी शासनाची असेल.
शासनाने या उपोषणासंदर्भात तातडीने निर्णय घेतला नाही, तर आगामी काळात माढा परिसरात यापेक्षाही तीव्र आंदोलन मराठा समाजाच्या वतीने करण्यात येईल.
– शंभू साठे
मराठा सेवक, माढा