धाराशिव – स्वातंत्र्यसेनानी देविदास माधव झरकर यांच्या राष्ट्रभक्तीचा वारसा पुढे नेत व्यवसाय शिक्षण, कौशल्य विकास, विद्यार्थीहित, संशोधन आणि सामाजिक कार्यात उल्लेखनीय योगदान देणारे भाई उद्धवराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, धाराशिवचे शिल्पनिदेशक डॉ. किरण प्रकाश झरकर यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. शिक्षक दिनानिमित्त ५ सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि ५० हजार रुपये असे आहे. यावेळी शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री जयंत चौधरी, शिक्षण राज्यमंत्री सुकांत मजूमदार तसेच शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण पूर्ण करून १७ वर्षांच्या सेवेत विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविणाऱ्या किरण झरकर यांच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली. आयटीआय प्रशिक्षणार्थ्यांच्या शैक्षणिक व आर्थिक प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला. आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना विद्यावेतन मिळावे यासाठी त्यांनी व्यापक जनसमर्थन उभे केले. तब्बल २५० ग्रामपंचायतींचे ठराव आणि १० हजार नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांद्वारे त्यांनी शासनाचे लक्ष वेधले.
‘व्यवसाय प्रशिक्षण परियोजना’च्या माध्यमातून औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या कार्यपद्धतीत सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांच्या कार्याची दखल घेत विधानसभा आणि विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित झाले. या कार्यात आमदार संजय केनेकर आणि आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचे सहकार्य लाभले.
झरकर यांच्या कार्यातील महत्त्वाचा उपक्रम म्हणजे ‘स्किलबुक’ ही संगणक प्रणाली. हा प्रकल्प साकारण्यासाठी त्यांच्या पत्नी स्मिता झरकर यांनी स्वतःचे दागिने विकून निधी उभा केला. पुढे ज्येष्ठ समाजसेवक रमेश अण्णा मुळे यांनी मदतीचा हात पुढे केला. नवी दिल्ली येथे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांच्या हस्ते या संगणक प्रणालीचे लोकार्पण झाले.
किरण झरकर हे ‘वंदे मातृशक्ती’ या पुस्तकाचे लेखक आहेत. राष्ट्रनिर्मितीत मातांच्या योगदानाचा गौरव करणाऱ्या या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री स्वर्गीय हिराबेन मोदी यांचा तसेच झरकर यांच्या मातोश्री शैला झरकर यांचा जीवनप्रवास मांडण्यात आला आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती ज्ञानसुधा मिश्रा आणि खासदार बासुरी स्वराज यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले.
किरण झरकर हे थोर स्वातंत्र्यसेनानी देविदास माधव झरकर यांचे नातू आहेत. देविदास झरकर यांनी स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग घेत ‘वंदे मातरम्’ आणि ‘जन गण मन’च्या माध्यमातून जनजागृती केली. विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीतही त्यांनी योगदान दिले. झरकर कुटुंबातील स्वर्गीय थोर स्वातंत्र्यसेनानी अँड. राजाभाऊ झरकर यांनीही राष्ट्रकार्य आणि सामाजिक क्षेत्रात योगदान दिले.
किरण झरकर यांच्या नावावर एक पेटंट, एक ट्रेडमार्क, १६ पुस्तके आणि तीन संशोधन प्रबंध आहेत. आयटीआय व कौशल्य विकास क्षेत्रावर त्यांनी शेकडो गाणी व लेखन केले आहे.
सामाजिक क्षेत्रातही ते रमेश अण्णा मुळे फाउंडेशन (छत्रपती संभाजीनगर), तेरणा यूथ फाउंडेशन (धाराशिव), श्री गणेश सेवा मंडळ (नवी दिल्ली) आणि रूपमाता फाउंडेशन (धाराशिव) यांच्या माध्यमातून कार्यरत आहेत.
त्यांच्या कार्यासाठी अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाचे अध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप खेडकर, महामंत्री डॉ. दिलीप अर्जुने, प्रा. डॉ. वैभव नरवडे आणि ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा. डॉ. शेखर चंद्रात्रे यांचे आशीर्वाद लाभले. तसेच प्रधान सचिव मनीषा वर्मा, संचालक सतीश सूर्यवंशी, सहसंचालक प्रदीप दुर्गे आणि प्राचार्य मारुती बिरादार यांचे मार्गदर्शन लाभले.
झरकर यांच्या संघर्षमय प्रवासाला त्यांच्या ‘पहाड जरी आले आडवे, ठिकऱ्या त्यांच्या उडवू; काळावरती स्वार होऊन, नवा इतिहास घडवू’ या ओळी सार्थ ठरवतात. धाराशिवच्या मातीतून विज्ञान भवनापर्यंत पोहोचलेला त्यांचा हा प्रवास मराठवाड्यातील आयटीआय आणि कौशल्य शिक्षण क्षेत्रासाठी अभिमानाचा ठरला आहे.


















