माढा – सोलापूर जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने शेतकरी मोठ्या अस्मानी संकटात सापडले आहेत. पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली असून अनेक भागांत पिके करपण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे संकटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने शासकीय मदत व पीक नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या सोलापूर (ग्रामीण) जिल्हाध्यक्षा विनंती अवधूत कुलकर्णी यांनी केली आहे.
याबाबत त्यांनी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. पेरणीसाठी बियाणे, खते, औषधे आदींसाठी शेतकऱ्यांनी मोठा खर्च केला आहे. मात्र, पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. आगामी काळात पिण्याच्या पाण्यासह पशुधनाच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर होण्याची शक्यता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
*निवेदनातील प्रमुख मागण्या :*
१) पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत व पीक नुकसानभरपाई देण्यात यावी.
२) शेतकऱ्यांच्या पीक कर्जासह इतर कृषी कर्जाबाबत तातडीने दिलासा देण्यात यावा.
३) दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेऊन पिण्याचे पाणी व पशुधनासाठी चाऱ्याची आवश्यक व्यवस्था करण्यात यावी.
४) पुढील हंगामासाठी शेतकऱ्यांना बियाणे, खते व कृषी निविष्ठा उपलब्ध करून द्याव्यात.
५) शेतकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात.
६) जिल्ह्यातील परिस्थितीचा तातडीने आढावा घेऊन दुष्काळी उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात.
“सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी हा जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेचा आधार आहे. नैसर्गिक संकटामुळे तो आर्थिक अडचणीत सापडला असताना शासनाने संवेदनशीलतेने व तातडीने निर्णय घेऊन शेतकऱ्यांना आधार द्यावा,” अशी मागणी विनंती कुलकर्णी यांनी केली आहे.
निवेदन देताना जिल्हाध्यक्ष वसंत देशमुख,शहर अध्यक्ष महेश गादेकर, महिला जिल्हाध्यक्ष पल्लवी पाटील,जिल्हा उपाध्यक्ष रामचंद्र मस्के,महिला शहर अध्यक्ष सुनीता रोटे, युवती प्रदेश उपाध्यक्ष चारुशीला कुलकर्णी, पंढरपूर शहर अध्यक्ष सुनंदा उमाटे, पंढरपूर तालुकाध्यक्ष रुपाली पवार, प्रदेश उपाध्यक्ष लता ढेरे, गौरा कोरे, व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
Post Views: 62