सोलापूर : महापालिकेचा कारभार प्रभावीपणे हाताळण्यापासून नागरिकांचे प्रश्न सोडविण्यापर्यंतचे धडे भाजपच्या नगरसेवकांना देण्यात येत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूरसह चार महापालिकांतील नगरसेवकांचे भाईंदर येथे प्रशिक्षण सुरू आहे.भाजपच्या नगरसेवकांना महापालिका कारभाराचे धडे देण्यात आले.
सभागृहापासून विकासकामांपर्यंत अनुभवी नेत्यांनी कारभाराचा कानमंत्र दिला.
महापालिका सभागृहातील प्रभावी कामकाज, प्रशासनाशी समन्वय, नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक आणि विकासकामांचे नियोजन कसे करावे, याचे धडे भाजपच्या नगरसेवकांना देण्यात येत आहेत. भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने आयोजित ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६’ अंतर्गत सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी आणि सांगली महानगरपालिकांतील भाजपच्या नगरसेवकांसाठी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, भाईंदर येथे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राजेश पांडे, चंद्रकांत पाटील, डॉ. विनय सहस्रबुद्धे, सोलापूरचे महापौर विनायक कोंड्याल यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रशिक्षणाच्या माध्यमातून नगरसेवकांना पक्षाची रणनीती, संघटनात्मक कार्यपद्धती आणि महापालिकेचे प्रभावी कामकाज याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेतील आपल्या अनुभवांचा दाखला देत नगरसेवकांनी सभागृहात प्रभावीपणे काम कसे करावे, नागरिकांचे प्रश्न प्रशासनाकडून कसे सोडवून घ्यावेत आणि विकासकामांचे नियोजन कोणत्या पद्धतीने करावे, याबाबत मार्गदर्शन केले.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी, पक्षाची भूमिका आणि संघटनात्मक शिस्त यावर मार्गदर्शन केले. मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे एकाच व्यासपीठावर मार्गदर्शन मिळाल्याने या प्रशिक्षणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अनुभवी नगरसेवकांचे अनुभवही मार्गदर्शकभाजपमधून यापूर्वी दोन-तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या अनुभवी लोकप्रतिनिधींनीही पूर्वीच्या प्रशिक्षणातील अनुभव आणि महापालिकेतील कामकाजाचे धडे नव्या नगरसेवकांसमोर मांडले. त्यामुळे अनुभवी आणि नव्या नगरसेवकांमध्ये संवादाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रशिक्षणामध्ये महासभा, स्थायी समिती आणि प्रभाग समितीचे कामकाज, सभागृहाचे नियम, प्रश्न उपस्थित करण्याची पद्धत, तारांकित व अतारांकित प्रश्न, प्रभावी भाषण, प्रशासनाशी समन्वय आणि नागरिकांच्या प्रश्नांवर काम करण्याची कार्यपद्धती या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात येत आहे.केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा महापालिका क्षेत्रात प्रभावी वापर, प्रभाग विकास आराखडा, पायाभूत सुविधा, स्वच्छ भारत अभियान, अमृत २.०, प्रधानमंत्री आवास योजना, पीएम स्वनिधी, डिजिटल सुशासन आणि नागरिकाभिमुख प्रशासन आदी विषयांचाही प्रशिक्षणात समावेश आहे.
नव्या नगरसेवकांना प्रश्न मांडण्याची संधी
नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांना महापालिका कामकाजासंदर्भातील प्रश्न थेट मांडण्याची संधी या प्रशिक्षणात मिळणार आहे. प्रशासनाशी समन्वय, नागरिकांच्या अपेक्षा, प्रभाग विकासाचे नियोजन आणि उपलब्ध निधीचा प्रभावी वापर यावरही चर्चा करण्यात येणार आहे.
प्रशिक्षणातील ठळक वैशिष्ट्ये
— फडणवीसांचे ‘महापालिका व्यवस्थापन’ धडे
— चार महापालिकांचे नगरसेवक एकत्र
— रवींद्र चव्हाण यांचा संघटनात्मक शिस्तीवर भर
— महासभेपासून स्थायी समितीपर्यंतचे प्रशिक्षण
— केंद्र-राज्य योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर लक्ष
Post Views: 29