वैराग – बार्शी तालुक्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. तालुकयातील गोरमाळे येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्याला पावसाअभावी करपून चाललेले उभे सोयाबीन पीक शेळ्यांना चारण्याची दुर्दैवी वेळ आली आहे.
गोरमाळे येथील अल्पभूधारक शेतकरी जयदेव सुखदेव शिंदे (वय ६७) यांनी आपल्या शेतातील उभे सोयाबीन पीक शेळ्यांना चारले. शिंदे हे शेतीबरोबरच सुमारे २० शेळ्यांचे पालन करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.
निसर्गाच्या अवकृपेने अतोनात नुकसान
यावर्षी त्यांनी सुमारे २० जूनच्या आसपास सोयाबीनची पेरणी केली होती. पेरणीनंतर सोयाबीनची उगवण चांगली झाली. मात्र, त्यानंतर परिसरात एकही समाधानकारक व मोठा पाऊस झाला नाही. सोयाबीन पिकाला फुले येण्याच्या महत्त्वाच्या अवस्थेत पाण्याची अत्यंत आवश्यकता असतानाच पावसाने पाठ फिरवली. परिणामी पिकाची वाढ खुंटली असून अनेक ठिकाणी सोयाबीन जागेवरच करपून वाळत चालले आहे.
३५ हजारांचा खर्च पाण्यात
सोयाबीन लागवडीसाठी बी-बियाणे, मशागत, पेरणी, खते, औषध फवारणी व इतर खर्च मिळून एकरी सुमारे ३० ते ३५ हजार रुपयांचा खर्च झाला असल्याचे शेतकरी जयदेव शिंदे यांनी सांगितले. मात्र, पावसाअभावी उत्पादन मिळण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आल्याने हा लावलेला खर्चही भरून निघणे अशक्य झाले आहे. अखेर हताश होऊन त्यांनी हे पीक शेळ्यांना चारण्याचा कठीण निर्णय घेतला.
Post Views: 14