सोलापूर – ऊस गाळप हंगाम संपून वर्षे उलटली, तरी थकीत ऊस बिलाची रक्कम हाती न आल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा संताप आता टोकाला पोहोचला आहे. गोकुळ शुगरकडून थकीत ऊस बिलाची रक्कम मिळत नसल्याचा आरोप करत संतप्त शेतकऱ्यांनी सोलापुरात चक्क झाडावर चढून आंदोलन केले. ‘बिलाची रक्कम खात्यावर जमा झाल्याशिवाय खाली उतरणार नाही,’ अशी आक्रमक भूमिका घेत शेतकऱ्यांनी प्रशासनासमोर नवा पेच निर्माण केला होता. मात्र प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.
सन २०२३ ते २०२५ या कालावधीतील २७० शेतकऱ्यांचे सुमारे १ कोटी ९७ लाख रुपये ऊस बिल थकीत असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे. थकीत रक्कम मिळावी यासाठी साखर आयुक्तालय तसेच जिल्हा प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही ठोस कार्यवाही झाली नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. वारंवार आश्वासने मिळूनही प्रत्यक्ष पैसे मिळत नसल्याने अखेर शेतकऱ्यांनी आंदोलनाचा आक्रमक मार्ग स्वीकारला.
ऊस कारखान्याला दिल्यानंतर त्याची साखर विक्री झाली; मात्र शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे वर्षानुवर्षे अडकून पडले आहेत. बँक कर्जाचे हप्ते, मुलांचे शिक्षण, शेतीचा खर्च आणि दैनंदिन संसाराचा गाडा चालवताना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, दत्ता शिंदे यांच्यावर तत्काळ कायदेशीर कारवाई करून थकीत रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. मागणी मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला.
शेतकरी झाडावर चढल्याची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तहसीलदार किरण जमदाडे यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोंडी आश्वासन नको, ठोस लेखी हमी आणि कायदेशीर कारवाईची स्पष्टता हवी, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली.
या आंदोलनात ॲड. अमोल पाटील (वागदरी), अरविंद घोडके (अणदूर), हनुमंत बिराजदार, भीमाशंकर आलुरे, काशिनाथ माने, अभिजीत सावळी, मल्लिनाथ शीलवंत, शरणाप्पा नागूर यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.
थकीत ऊस बिलाचा प्रश्न केवळ देयकाचा नसून शेतकऱ्यांच्या आर्थिक अस्तित्वाचा प्रश्न बनला आहे. त्यामुळे प्रशासनाने केवळ मध्यस्थी न करता थकीत रकमेबाबत तातडीने निर्णय घेऊन शेतकऱ्यांना प्रत्यक्ष दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.
Post Views: 16