सोलापूर : शहराला नियमित व सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेने तयार केलेल्या १ हजार ४८३ कोटी रुपयांच्या जलवितरण आराखड्यात राज्याच्या मुख्य सचिवांनी काही त्रुटी काढल्या असून त्याची पूर्तता करून हा आराखडा आज मंगळवारी पुन्हा सादर करण्यात येणार आहे.
राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासमोर महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी गुरुवारी
सादरीकरण केले होते. यावेळी सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे तसेच प्रकल्पाशी संबंधित अधिकारी उपस्थित होते. सादरीकरणावेळी प्रकल्पाची आवश्यकता, शहरातील सध्याची जलवितरण व्यवस्था आणि प्रस्तावित आराखड्यामुळे नागरिकांना होणारे फायदे याबाबत माहिती देण्यात आली.यावेळी मुख्य सचिवांनी काही महत्वाचे मुद्दे उपस्थित केले. शहरांची लोकसंख्या, सध्याची पाणी योजना, वितरण व्यवस्था, नव्या योजनेनंतर होणारा पाणीपुरवठा यावर प्रश्नोत्तरे झाली होती.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या माध्यमातून शहरातील जुन्या जलवाहिन्यांचे जाळे सक्षम करण्याबरोबरच वाढत्या शहराची भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन जलवितरण व्यवस्था सुधारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. विविध परिसरातील जलवितरण व्यवस्था सक्षम करण्याचा आराखड्यात समावेश आहे. हा प्रकल्प निकडीचा व सार्वजनिक महत्त्वाचा प्रकल्प म्हणून राबविण्यास राज्य मंत्रिमंडळाने यापूर्वीच मंजुरी दिली आहे.
या आराखड्याचे सविस्तर सादरीकरण राज्याच्या नगरविकास विभागाचे मुख्य सचिव गोविंदराज यांच्यासमोर करण्यात आले होते. त्यावेळी आराखड्याची सविस्तर माहिती, निविदा प्रक्रिया, प्रकल्पाची अंमलबजावणी तसेच महापालिकेच्या निधीची उभारणी याबाबत चर्चा झाली होती. त्यानंतर गुरुवारी मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासमोर प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले होते. मुख्य सचिवांकडून या प्रकल्पाला अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर महिनाभरात १ हजार ४८३ कोटी रुपयांच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे अशी माहिती वेंकटेश चौबे यांनी दिली.
जलवितरण आराखडा मंजूर झाल्यास शहरातील पाणीपुरवठ्याची पायाभूत व्यवस्था मोठ्या प्रमाणात सक्षम होऊन भविष्यातील वाढत्या लोकसंख्येची पाण्याची गरज भागविण्यास मदत होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प सोलापूरच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.
Post Views: 13