सांगोला – जिथे अधिक प्रवाशी तिथे अधिक गाड्या या धर्तीवर सांगोला-दापोली बस सेवा पुनःश्च सुरु करावी अशा मागणीचे निवेदन सांगोल्यातील शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्या वतीने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना देण्यात आले. सांगोला आगारातून उन्हाळा हंगामामध्ये सांगोला-दापोली ही बस सेवा नाझरे, आटपाडी, खानापूर, विटा, कराड, खेड, चिपळूण मार्गे दापोली सांगोला येथून स.८ वा सुरु करण्यात आली होती. सदरच्या सेवेमुळे प्रवाशामध्ये समाधानाचे व आनंदाचे वातावरण पसरले होते. सदरच्या बसला प्रवाशांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळाल्याने बसच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात दैनंदिन वाढ होत होती. परंतु काही महिन्यातच शाळा सुरु झाल्याने बस संख्या अपुरी असल्याकारणाने सदरची सेवा पूर्णतः बंद करण्यात आली. प्रवाशांच्या मागणीची व डायरेक्ट सोय नसल्याने प्रवाशांची गैरसोय याचा विचार करून सांगोला आगारातून सांगोला-दापोली बस पूर्ववत सुरु करण्याची मागणी संघटनेने केली आहे. या निवेदनाच्या प्रती माजी आ.शहाजीबापू पाटील, महाव्यवस्थापक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मुंबई सेंट्रल, विभाग नियंत्रक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सोलापूर विभाग यांनाही देण्यात आले आहे. सांगोला आगाराकडे बसेस उपलब्ध नसतील तर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी जिथे अधिक प्रवाशी तिथे अधिक गाड्या या नवीन धोरणानुसार चिपळूण, दापोली, खेड व इतर आगाराकडून ही बस सेवा सुरु करण्यात यावी अशी मागणी केल्याचे संघटनेचे अध्यक्ष निलकंठ शिंदे यांनी सांगितले.
Post Views: 14