सोलापूर – पावसाने पुन्हा ओढ दिल्याने जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणीटंचाईचे संकट कायम असल्याचे चित्र आहे. जिल्हा प्रशासनाच्या ७ सप्टेंबरच्या दैनंदिन अहवालानुसार, टंचाई निवारणासाठी विविध गाव-वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत असून, सुमारे ९८ हजार १५२ नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे पावसाळा सुरू असतानाही अनेक भागांतील नागरिकांची पाण्यासाठीची धावपळ अद्याप थांबलेली नाही.
जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये पाणीपुरवठ्याची परिस्थिती असमान आहे. काही ठिकाणी पावसामुळे परिस्थितीत सुधारणा झाली असली, तरी काही गावांमध्ये विहिरी, बोअरवेल आणि अन्य स्थानिक जलस्रोतांमध्ये अपेक्षित पाणीसाठा निर्माण झालेला नाही. परिणामी प्रशासनाला टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू ठेवावा लागत आहे.
अहवालातील आकडेवारीनुसार माळशिरस तालुक्यात २७ हजार ४२९, माढा तालुक्यात २० हजार २४२, बार्शी तालुक्यात १६ हजार ९११, करमाळा तालुक्यात १५ हजार ९९५, तर सांगोला तालुक्यात १४ हजार १७ नागरिक पाणीटंचाईने प्रभावित आहेत. याशिवाय मंगळवेढा, मोहोळ, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट आणि पंढरपूर तालुक्यांमध्येही टंचाई निवारणासाठी उपाययोजना सुरू आहेत.
विशेष म्हणजे, पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये केवळ टँकर सुरू करणे हा तात्पुरता उपाय ठरत आहे. त्यामुळे उपलब्ध शासकीय तसेच खासगी विहिरींचे अधिग्रहण, बंद पडलेल्या जलस्रोतांची दुरुस्ती, विहिरींची खोली वाढविणे आणि पाणी उपलब्ध असलेल्या स्रोतांचे योग्य नियोजन करण्यावर प्रशासनाने भर देणे गरजेचे आहे.
गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अपेक्षेप्रमाणे झाले नसल्याने भूजलपातळीवरही त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे टँकरची मागणी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने टँकरची संख्या, फेऱ्या आणि पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक यांचे काटेकोर नियोजन करणे आवश्यक आहे. गावागावांत नागरिकांना नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा मिळतोय की नाही, याची प्रत्यक्ष पाहणी करण्याची गरजही निर्माण झाली आहे.
दरम्यान, पावसाचा जोर वाढल्यास परिस्थितीत सुधारणा होऊ शकते. मात्र तोपर्यंत टंचाईग्रस्त भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी टँकर पुरवठ्याबरोबरच कायमस्वरूपी जलस्रोत सक्षम करण्याच्या उपाययोजनांना गती देणे हीच प्रशासनासमोरील प्रमुख गरज आहे.
कोट
सोलापूर जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांमध्ये नागरिकांना वेळेवर आणि पुरेसा पाणीपुरवठा मिळावा, यासाठी प्रशासनाने टँकरच्या फेऱ्यांचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. केवळ टँकरवर अवलंबून न राहता उपलब्ध विहिरींचे अधिग्रहण, जलस्रोतांची दुरुस्ती आणि कायमस्वरूपी पाणीपुरवठ्याच्या उपाययोजनांना प्राधान्य दिले पाहिजे. पाणीटंचाईग्रस्त नागरिकांना कोणत्याही परिस्थितीत पाण्यासाठी वणवण करावी लागू नये, यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने आणि तातडीने कार्यवाही करावी. असे सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य यांनी सांगितले.
Post Views: 15