सोलापूर – जिल्हा परिषदेमार्फत शेतकरी, पशुपालक आणि ग्रामीण भागासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांना यंदा वाढीव निधीची प्रतीक्षा आहे. कृषी विभागाच्या २०२६-२७ या आर्थिक वर्षातील योजनांसाठी मंजूर तरतूद अपुरी पडत असल्याने काही महत्त्वाच्या योजनांना अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. विशेषतः कृषी अभियांत्रिकी आणि सुधारित औजारे-साहित्य पुरवठा योजनांसाठी निधी वाढविण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषद प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेच्या स्वउत्पन्नातून कृषी विभागासाठी सन २०२५-२६ च्या सुधारित आणि २०२६-२७ च्या मूळ अंदाजपत्रकात सुमारे ३८५.१० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, शेतकऱ्यांकडून विविध योजनांना मिळणारा प्रतिसाद आणि वाढती मागणी लक्षात घेता अतिरिक्त निधीची आवश्यकता असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
सुधारित औजारे-साहित्य पुरवठा योजनेतील स्लरी फिल्टरसाठी २.१५ लाख रुपये, तर कृषी अभियांत्रिकी योजनेतील ट्रॅक्टरचलित औजारे, रोटाव्हेटर, पेरणी यंत्र, पलटी नांगर, रोटरी टिलर तसेच वीडर आदींसाठी मोठ्या प्रमाणावर निधीची गरज आहे. या योजनांसाठी मिळून एक कोटी रुपयांचा वाढीव निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे यंत्रसामग्रीच्या माध्यमातून शेतीतील मजुरीचा खर्च कमी करून उत्पादनक्षमता वाढविण्याची संधी शेतकऱ्यांना मिळू शकते.
कृषी विभागाच्या अंदाजपत्रकात पीक संरक्षण औजारे, बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप, पॉवर स्प्रे पंप, ब्रश कटर, सोलार इन्सेक्ट ट्रॅप, तुषार सिंचन, कडबाकुट्टी, ताडपत्री, मधुमक्षिका पेट्या, स्लरी फिल्टर आदी योजनांचाही समावेश आहे. तसेच पीक विविधीकरण, सेंद्रिय शेती, महिला शेतकरी गट आणि कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार यांसारख्या योजनांसाठीही तरतूद प्रस्तावित आहे.
दरम्यान, पशुसंवर्धन विभागाच्या अंदाजपत्रकात लसीकरण, जंतनाशक व गोचीडनाशक औषधांचा पुरवठा, पशुवैद्यकीय दवाखान्यांना औषधे, दुग्धोत्पादन वाढीसाठी वंश सुधारणा, पशुपालकांना कडबाकुट्टी व मिल्किंग मशीन, मुरघास निर्मितीसाठी प्रोत्साहन, स्तनदाह निर्मूलन तसेच नैसर्गिक आपत्तीत मृत जनावरांसाठी नुकसानभरपाई अशा विविध योजनांचा समावेश आहे.
निधी वाढल्यास योजनांचा लाभ अधिकाधिक शेतकरी व पशुपालकांपर्यंत पोहोचू शकणार आहे. त्यामुळे प्रस्तावित वाढीव निधीला मंजुरी कधी मिळते, याकडे ग्रामीण भागाचे लक्ष लागले आहे.
कोट
“वाढीव निधी मिळाल्यास शेतकरी-पशुपालकांना योजनांचा थेट लाभ देता येईल”
जिल्ह्यातील शेतकरी आणि पशुपालकांच्या गरजा लक्षात घेऊन कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्याचा आमचा प्रयत्न आहे. सध्या अनेक योजनांसाठी उपलब्ध असलेला निधी अपुरा ठरत असून, वाढीव निधीची मागणी करण्यात आली आहे. कृषी अवजारे, आधुनिक यंत्रसामग्री, पीक संरक्षण साधने, दुग्धोत्पादन वाढ, पशुधन आरोग्य आणि पशुपालकांसाठीच्या योजनांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. वाढीव निधीला मंजुरी मिळाल्यास अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचवून शेतीचा खर्च कमी करणे आणि शेतकरी-पशुपालकांचे उत्पन्न वाढविण्यासाठी ठोस प्रयत्न करता येतील.”
– रामप्पा चिवडशेट्टी, सभापती, कृषी व पशुसंवर्धन, दुग्धविकास समिती, जि.प. सोलापूर :