टेंभुर्णी – रक्ताचे पाणी करून, मेहनतीने फुलवलेल्या तोंडल्याच्या बागेवर समाजकंटकाने धारदार कोयत्याने घाला घातल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. चव्हाणवाडी रोड, टेंभुर्णी येथील गट क्रमांक ८३/५ मधील नंदकुमार सदाशिव कथले यांच्या भरात आलेल्या १५ गुंठे तोंडल्याच्या बागेची अज्ञात व्यक्तीने बुधवारी रात्री छाटणी करून अक्षरशः नासधूस केली.
गुरुवारी सकाळी कथले बागेत गेले असता संपूर्ण बाग उद्ध्वस्त झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. डोळ्यांसमोर उभी केलेली आणि उत्पन्न देऊ लागलेली बाग अशा अवस्थेत पाहून शेतकऱ्याला मोठा धक्का बसला.
या घटनेत कथले यांचे अंदाजे एक ते सव्वा लाख रुपयांचे नुकसान झाले असून, या बागेतून त्यांना दररोज सुमारे दोन हजार रुपयांचे उत्पन्न मिळत होते. त्यामुळे केवळ पिकाचे नुकसान झाले नसून आगामी काळातील नियमित उत्पन्नाचा आधारही हिरावला गेला आहे.
शेतकऱ्याने मोठ्या कष्टाने उभ्या केलेल्या पिकाची अशा प्रकारे नासधूस करणाऱ्या समाजकंटकाचा तातडीने शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.
Post Views: 30