वैराग – महाराष्ट्रात रोजगार हमी योजनेची (रोहयो) अंमलबजावणी ज्यांच्या ऐतिहासिक बलिदानामुळे झाली, त्या वैराग येथील ८ हुतात्म्यांच्या स्मृती जागविण्यासाठी रविवारी (दि. ६ सप्टेंबर) सायंकाळी संपूर्ण वैराग शहर नतमस्तक झाले. १९७१ च्या भीषण दुष्काळात रोजगाराच्या हक्कासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या या हुतात्म्यांच्या त्यागाचे स्मरण करत, तब्बल अडीच किलोमीटरचा भव्य मूक मोर्चा काढून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
रक्तरंजित इतिहास आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी
१९७१ मध्ये राज्यात अत्यंत भयानक दुष्काळ पडला होता. वैराग व परिसरातील ग्रामीण भागात उपासमारीची तीव्र लाट आली होती. एकीकडे जनता अन्नासाठी तरसत होती, तर दुसरीकडे येथील शासकीय गोदामात हजारो पोती धान्य पडून होते. या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप) नेते भाई (कै.) चंद्रकांत निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली बार्शी तहसील कार्यालयावर दोन वेळा मोर्चे काढण्यात आले.
त्यानंतर ६ सप्टेंबर १९७१ रोजी ‘हाताला काम द्या, नाहीतर पोटाला धान्य द्या!’ ही प्रमुख मागणी घेऊन वैराग येथील शासकीय गोदामावर तिसरा भव्य मोर्चा धडकला. या आंदोलनादरम्यान तत्कालीन पोलिस अधीक्षक डेमला यांनी दुषित भावनेने आणि बेधुंद गोळीबाराचे आदेश दिले. या अमानुष गोळीबारात ८ आंदोलक जागीच हुतात्मा झाले, तर ५४ नागरिक गंभीर जखमी झाले. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आणि अखेर शासन खडबडून जागे होऊन गोरगरीब कष्टकऱ्यांसाठी ऐतिहासिक ‘रोजगार हमी योजना’ लागू करण्यात आली.
शांततेत निघाला अडीच किलोमीटरचा मोर्चा
गेल्या ५६ वर्षांची परंपरा जपत, रविवारी सायंकाळी ६ वाजता खंडोबा वेस येथून मूक मोर्चास प्रारंभ झाला. कोणत्याही प्रकारच्या घोषणा न देता, शेकडो ग्रामस्थ शांततेत अडीच किलोमीटरचे अंतर चालून हुतात्मा स्मारकापर्यंत पोहोचले. तिथे सर्व हुतात्म्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. नव्या पिढीला या बलिदानाची माहिती व्हावी आणि त्यांच्या त्यागातून प्रेरणा मिळावी यासाठी दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
हे ८ वीर झाले होते हुतात्मा:
* एकनाथ साळुंके (वैराग)
* चतुर्भुज विठ्ठल तकभाते (श्रीपतपिंपरी)
* रघुनाथ गणपती माने (रातंजन)
* उद्धव श्रीपती गोफणे (हळदुगे)
* इब्राहिम चांद शेख (वैराग)
* बब्रुवान तुळशीराम माळी (मानेगाव)
* भास्कर बाबूराव वाळके (मानेगाव)
* सुंदरबाई लक्ष्मण चव्हाण (वैराग)
मान्यवरांची उपस्थिती
या प्रसंगी पंचायत समिती उपसभापती संतोष निंबाळकर, माजी सभापती मकरंद निंबाळकर, जिवाजीराव पाटील, अरुण सावंत, मनोज डुरे पाटील, विनायक देशमुख, तात्यासाहेब करांडे, संचालक नेताजी घायटिडक, बापूसाहेब बुरुगुटे, भाऊसाहेब काशीद आदींसह विविध क्षेत्रांतील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 27