सोलापूर : शिवसेनेच्या खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांची संसदेच्या महत्त्वाच्या ‘कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, कायदा आणि न्याय’ या संसदीय स्थायी समितीवर सदस्य म्हणून निवड झाली आहे. समितीवरील निवडीनंतर झालेल्या पहिल्याच बैठकीत त्यांनी रेल्वे भरती प्रक्रियेतील विविध प्रश्नांवर रोखठोक भूमिका मांडली.
रेल्वे भरतीचा आढावा घेताना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी तसेच दिव्यांग उमेदवारांचा प्रलंबित अनुशेष तातडीने भरून काढावा. भरती प्रक्रियेत महिलांचे प्रमाण वाढविण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली. पेपरफुटी आणि भरती परीक्षांमधील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कायदेशीर व प्रशासकीय उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली.
बदलत्या तंत्रज्ञानाचा विचार करून रेल्वे भरती परीक्षांचा अभ्यासक्रम अद्ययावत करावा. भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक, वेगवान आणि विश्वासार्ह करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा, अशी सूचनाही त्यांनी केली.
समितीचे अध्यक्ष खासदार ब्रिजलाल यांच्यासह ए. राजा, लालजी वर्मा, वरुण चौधरी, अनूप चक्रवर्ती आदी सदस्य तसेच रेल्वे भरती मंडळाचे वरिष्ठ अधिकारी बैठकीस उपस्थित होते. राज्यसभा खासदार झाल्यानंतर डॉ. वाघमारे यांची विविध महत्त्वाच्या समित्यांवर निवड झाली असून, या माध्यमातून लोकहिताच्या प्रश्नांवर त्यांची सक्रिय भूमिका स्पष्ट होत आहे.
Post Views: 11