पंढरपूर – रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर येथील एम.कॉम. भाग–२चा विद्यार्थी सोहेल काझी याने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अंपायर परीक्षेत यश संपादन करून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अंपायर पॅनेलमध्ये स्थान मिळविले आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडून अंपायर पॅनेलसाठी परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेत यशस्वी झालेल्या अंपायर्सना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या सामन्यांमध्ये अंपायर म्हणून काम करण्याची संधी मिळते.
क्रिकेट क्षेत्रातील अंपायरिंगसारख्या महत्त्वपूर्ण आणि जबाबदारीच्या भूमिकेसाठी आवश्यक असलेली परीक्षा उत्तीर्ण करून सोहेल काझी याने आपल्या क्रीडा कारकिर्दीत आणखी एक उल्लेखनीय टप्पा गाठला आहे. खेळाडू म्हणून मैदानावर योगदान दिल्यानंतर आता अंपायर म्हणून मैदानावर निर्णय देण्याची नवी जबाबदारी त्याच्यावर आली आहे. त्याच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
सोहेल काझी याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. टी. जाधव, सर्व विभागांचे उपप्राचार्य, सर्व विभागप्रमुख, जिमखाना विभागप्रमुख प्रा. अनिल परमार, प्रा. विठ्ठल फुले, प्रा. मनोज खपाले तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी यांनी त्याचे अभिनंदन करून त्याच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्राचार्य डॉ. बी. टी. जाधव यांनी, “शिक्षणासोबत क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी करून विद्यार्थ्यांनी नवनवीन संधी मिळवाव्यात, यासाठी महाविद्यालय सदैव प्रोत्साहन देत राहील,” असे मत व्यक्त केले.
सोहेल काझीच्या या यशामुळे महाविद्यालय परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, त्याच्या पुढील अंपायरिंग कारकिर्दीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Post Views: 10