बार्शी – महाविद्यालयीन जीवनामध्ये विद्यार्थ्यांनी व्यसनापासून दूर राहिले पाहिजे. तसेच आम्ली पदार्थांचे सेवन करण्याचे प्रमाण वाढणे समाजासाठी हानीकारक आहे. युवकांनी स्वत: आम्ली पदार्थ सेवन करणे टाळावे, असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक गणेश कुंभार यांनी केले.
्येथील श्री शिवाजी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि रेड रिबन क्लब बार्शी शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने नशामुक्त युवा फॉर विकसित भारत या विषयावर पोलीस निरीक्षक कुंभार मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अब्दुल शेख होते. यावेळी रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. दामाजी भिसे, प्रा. समाधान लोंढे, डॉ. आसावरी फरताडे, डॉ. राहुल पालके, प्रा. वैभव कुलकर्णी आदी उपस्थित होते.
पुढे पोलीस निरीक्षक कुंभार म्हणाले की, आम्ली पदार्थच्या विरोधी सरकारने कडक कायदे केले आहे. आम्ली पदार्थ घेतल्याने आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. आम्ली पदार्थ बाळगणे अजामीन पात्र गुन्हा आहे. युवकांनी इच्छाशक्तीच्या आधारे करिअर घडविले पाहिजे. वाईट मित्रांची संगत सोडून चांगल्या मित्रांची संगत केली पाहिजे, असे ही त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. शेख यांनी पालकांनी पाल्यांचे व्यक्तिमत्व घडविण्यासाठी शैक्षणिक संधी उपलब्ध करुन दिली आहे. याची जाणीव सर्व विद्यार्थ्यांना असली पाहिजे. वेळेचा सदुपयोग करुन आपले ध्येय साकार केले पाहिजे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून जनजागृती करुन राष्ट्र उभारणीचे काम केले जात आहे, असे त्यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. दामाजी भिसे यांनी, सूत्रसंचालन कु. क्रांती अनभुले आणि कु. राजनंदिनी मिरगणे हिने तर आभार प्रदर्शन प्रा. समाधान लोंढे यांनी केले.
Post Views: 30