सोलापूर – जिल्हा परिषद शाळांमधील भौतिक सुविधांची कमतरता दूर करून विद्यार्थ्यांना सुरक्षित व गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी आता डी श्रेणीतील शाळांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. प्रत्येक डी श्रेणीतील शाळेची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक सुविधांची नोंद, कामांचा प्राधान्यक्रम आणि त्यासाठीचा कृती आराखडा तयार करण्याचे नियोजन शिक्षण विभागाने केले आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सोमवार होणाऱ्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने जिल्ह्यातील शाळांच्या सद्यस्थितीचा आढावा घेत तयारी पूर्ण केली आहे.
‘सेवा संकल्प अभियान’च्या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या शैक्षणिक सुविधा व गुणवत्ता विकास अभियानाला यामुळे अधिक गती मिळणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागाकडून शाळांच्या भौतिक सुविधा आणि शैक्षणिक गुणवत्तेचा एकत्रित आढावा घेतला जात आहे.
( टीप मेल वरील फोटो लावणे आणि जिल्हा परिषद दाखवणे
जिल्हा परिषद शाळांचे उपलब्ध सुविधा, सुरक्षितता आणि शैक्षणिक साधनसामग्रीच्या आधारे ए, बी, सी आणि डी अशा श्रेणींमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे. यातील डी श्रेणीतील शाळांमध्ये नेमकी कोणती सुविधा अपुरी आहे, कोणत्या कामाला तातडीने प्राधान्य द्यावे आणि कोणत्या उपाययोजनांमुळे शाळेला पुढील श्रेणीत नेता येईल, याचा शाळानिहाय आराखडा तयार केला जाणार आहे.
वर्गखोल्या, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, वीज, किचन शेड, संरक्षण भिंत, क्रीडांगण, ग्रंथालय, प्रयोगशाळा, शैक्षणिक साहित्य, हँडवॉश स्टेशन, रॅम्प, संगणक, इंटरनेट, सीसीटीव्ही आणि इंटरॅक्टिव्ह पॅनेल अशा सुविधांची तपासणी करण्यात येणार आहे. धोकादायक अथवा जीर्ण इमारतींच्या बाबतीत आवश्यकतेनुसार स्ट्रक्चरल ऑडिट करून सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, उपाध्यक्ष तथा अर्थ व बांधकाम समितीचे सभापती इंद्रजीत पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती चेतनसिंह केदार-सावंत आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी विशाल मुळे यांच्या उपस्थितीत शिक्षण विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी सर्व गटशिक्षणाधिकारी तसेच समग्र शिक्षा अभियानातील अभियंत्यांकडून तालुकानिहाय शाळांच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला.
चौकट
प्रत्येक शाळेला प्रत्यक्ष भेटीचे उद्दिष्ट
शाळांची खरी परिस्थिती कागदावरील अहवालातून नव्हे, तर प्रत्यक्ष पाहणीतून समोर यावी, यासाठी सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक शाळेला १०० टक्के भेट देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शाळेतील उपलब्ध सुविधा, आवश्यक कामे, विद्यार्थ्यांच्या अडचणी आणि तातडीच्या उपाययोजनांची वस्तुनिष्ठ माहिती संकलित केली जाणार आहे.
चौकट
शिक्षण-बांधकाम विभागाचा संयुक्त आराखडा
भौतिक सुविधांची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी शिक्षण विभाग आणि बांधकाम विभागातील अभियंत्यांची संयुक्त बैठक घेऊन कामांचे प्राधान्यक्रम निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे केवळ सुविधा किती आहेत याचे मूल्यांकन न करता कोणत्या शाळेत काय काम करायचे, कोणत्या कामाला प्रथम प्राधान्य द्यायचे आणि शाळेला पुढील श्रेणीत कसे नेता येईल, यावर पुढील कार्यवाहीचा भर राहणार आहे.
कोट
विद्यार्थ्यांच्या दैनंदिन शैक्षणिक अनुभवात प्रत्यक्ष बदल
शाळांचा कायापालट करताना भौतिक सुविधांसोबत विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, सुरक्षितता आणि शिकण्याचे वातावरण यांनाही समान महत्त्व दिले जाणार आहे. त्यामुळे डी श्रेणीतील शाळांना पुढील श्रेणीत नेण्याची प्रक्रिया ही केवळ श्रेणी सुधारण्यापुरती मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांच्या दैनंदिन शैक्षणिक अनुभवात प्रत्यक्ष बदल घडविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणार आहे.
– कुशल जैन मुख्य कार्यकारी अधिकारी सोलापूर जिल्हा परिषद